वारजे, ता. 23 : कै.गुलाबराव तुकाराम वांजळे या प्रशालेत माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2005- 06 मधील अहिरे पुनर्वसन महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाची रुपरेषा आखली.






विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा आणि मुख्याध्यापकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या सत्कारातून विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आपले प्रेम व आदर व्यक्त केला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदीप उर्फ बाबा धुमाळ आणि प्रमुख पाहुणे दिलीप कदम होते. वारजे विभागातील मनपा शाळेत अशा प्रकारचा माजी विद्यार्थी मेळावा प्रथमच आयोजित केला आहे. असे गौरवोद्गार शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष धुमाळ यांनी या वेळी काढले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिलीप कदम यांनी या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या प्राथमिक शाळेशी नाळ जोडून ठेवल्याबद्दल
त्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी यावेळेस कथन केल्या. प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका पद्मजा पेठकर यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थी प्रमुख आणि अहिरे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष किरण वांजळे यांनी महापालिकेतील माजी विद्यार्थी संघटनेच्या रोपाचे वट वृक्षात रूपांतर करण्याचे या प्रसंगी शब्द दिला. या कार्यक्रमात सर्व ज्येष्ठ शिक्षकांनी आपल्या मनोगतातून शाळेतील सुंदर आठवणींना उजाळा दिला. तसेच विद्यार्थी सुद्धा लहानपणापासूनच्या प्राथमिक शाळेतील कितीतरी आठवणीमध्ये रममाण झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा सुतार या विद्यार्थिनीने केले. सारीका खाडे ,ज्योती कदम, किरण वांजळे , अशोक ढोले, अजय इंगळे, स्वप्नील कुंभार, स्वप्निल मापारे, गौरी मोरे, सीता सरकते, निलेश मालवीय, प्रतिभा गावडे, अविनाश समगीर, बाळू राठोड या विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नातून हा स्नेहा मेळावा यशस्वीपणे पार पडला. यावेळी इयत्ता पहिलीपासूनच्या शिक्षिका निशा बेंगळे या मुख्याध्यापिका पदावरुन सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त सर्व आजी माजी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या भेटी घडवून आणाव्यात याविचाराने प्रेरित होऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. किरण वांजळे यांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केले.










