गुंडांच्या टोळ्या तुम्हीच पोसल्या, गज्या मारणे टोळीवरून मोहोळांवर धंगेकरांचा बोचरा वार

0

कुख्यात गुंड गजानन मारणे याचा भाचा आणि मारणे टोळीतील गुंडांनी कोथरूड मध्ये एका युवकाला बेदम मारहाण केली. हा तरुण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील कर्मचारी असल्याचे समोर आले. पुण्यातील या गुंडगिरीवरून माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे. पेरले तेच उगवले..! असे म्हणत धंगेकरांनी मोहोळांवर टीकास्त्र सोडले आहे.

शिवजयंतीच्या दिनी कोथरूड परिसरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीसमोरून मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणारा देवेंद्र जोग हा आपली बाईक घेऊन गेला. त्यावर मिरवणुकीसमोरून गेला, याचा राग आल्याने चार जणांनी त्याला थांबवलं आणि शिवीगाळ करत वाद घातला. यातच देवेंद्र जोगला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जखमी झालेल्या देवेंद्र जोगला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त करत पोलिस आयुक्तांना या घटनेबाबत कडक कारवाई करण्याची सूचना केली. या घटनेनंतर पुण्यातील गुंडगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

धंगेकरांचा बोचरा वार…

काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी गुंडगिरीच्या मुद्यावर मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे. रविंद्र धंगेकर यांनी ‘पेरले तेच उगवले..!’असे नमूद करत म्हटले की, जेव्हा माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना गुंडांच्या या टोळ्या त्रास देतात तेव्हा याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करणाऱ्या खासदारांनी स्वतःच्या ऑफिस मधील मुलाला मारहाण झाल्यानंतर मात्र अचानक आक्रमक भूमिका घेतली असल्याचे त्यांनी म्हटले.

रविंद्र धंगेकर यांनी पुढे म्हटले की, पुण्यनगरीच्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल खासदारांनी खरंतर आत्मपरीक्षण करायला हवं. या गुंडांच्या टोळ्या आपणच पोसलेल्या आहेत. आपणच निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना धमकवण्यापासून तर पैसे वाटप करण्यापर्यंत या टोळ्यांचा वापर केला.आज याच गुंडांच्या टोळ्या माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना सर्वत्र त्रास देत आहेत. फरक फक्त इतकाच आहे की, आज ते तुमच्या ऑफिसपर्यंत पोहचलेत म्हणून आपण जागे झालात असा टोलाही रविंद्र धंगेकर यांनी लगावला.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

पोलिसांचा वचक नाही?

काही महिन्यांपूर्वीच पुण्यात पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर कुख्यात गुन्हेगार, गुंड तसेच या टोळीचे नामचीन गुंड यांची परेड पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडली. मात्र त्यानंतरही गुंडा गजानन मारणे याच्या टोळीतील सदस्यांनी कोथरूड भागात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्याचे मालक या नावाने सोशल मिडीयात रील्स टाकून मारणे यांची दहशत वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे पोलिसांचा गुंडांवरील वचक कमी होऊ लागला आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे.