महाराष्ट्रातून कर्नाटक सीमावर्ती भागात तणाव सर्व गाड्या रद्द, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी निर्णय, परिवहन मंत्र्यांची माहिती

0

काल रात्री कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचा आम्ही निषेध करतो. प्रवासी आणि आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन पुढील अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनवार यांना दिले आहेत.

परिवहन मंत्री सरनाईक यांनी या घटनेत जखमी झालेले चालक भास्कर जाधव यांच्याशी दूरध्वनीवर बोलून त्यांना धीर दिला. तसेच या प्रकरणात तुम्ही एकटे नसून, आपले सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहे.” अशी ग्वाही देखील दिली. तसेच कर्नाटक शासन या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन जोपर्यंत आपल्या शासनाची चर्चा करत नाही तोपर्यंत त्या भागातील महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात येतील. असे निर्देश देखील त्यांनी एसटी महामंडळाला यावेळी दिले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

काल रात्री दि.२१/०२/२०२५ रोजी ठिक २१.१० वाजता मुंबई आगाराची बस बंगळुरू -मुंबई येत असताना (बस क्रमांक MH14 K Q 7714) ही बस चित्रदुर्ग च्या पाठीमागे दोन किलोमीटर आली असता तथाकथित कर्नाटक संघटनेचे कार्यकर्ते यांनी गाडी थांबवून बस व चालकाला काळे फासले. तसेच कर्तव्यावर असणाऱ्या चालक भास्कर जाधव यांना मारहाण देखील करण्यात आली. हे दोघेही कोल्हापूर आगारात कार्यरत आहेत.

त्यानंतर वरिष्ठांच्या सुचनेनुसार त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली आहे. आज सकाळी विभाग नियंत्रक कोल्हापूर यांनी बस व चालक – वाहक यांना सुखरूप कोल्हापूर येथे आणले. तथापि, सीमावर्ती भागातील तणाव लक्षात घेता, परिवहन मंत्री श्री ‌प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणारे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोल्हापुरातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. असे एसटी महामंडळ कडून कळवण्यात आले आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा