तब्बल 25 कोटींचा ‘आमदार’ कोल्हापुरात अवतरला; वय 4 वर्षे दीड टन वजन, 6 फूट उंच 14 फूट लांब 25 कोटी किंमत

0

महाराष्ट्राच्या राजकारणात ’50 खोके एकदम ओके’ वाक्यानं जनसामान्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता कोल्हापुरात अवतरलेला 25 खोक्यांचा ‘आमदार’ पाहण्यासाठी भीमा कृषी प्रदर्शनात तुडुंब गर्दी झाली आहे. हा आमदार म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून महाकाय रेडा आहे. पानिपतवरून थेट कोल्हापुरात अवतरलेला हा आमदार म्हणजे जगातील सर्वात मोठा रेडा होय. त्याचं नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण खरोखरच त्याचं नाव आमदार आहे. या ‘आमदार’चं वय अवघं 4 वर्षे. वजन तब्बल दीड टन, उंची 6 फूट, लांबी 14 फूट आणि किंमत तब्बल 25 कोटी. देशात कुठेही फिरण्यासाठी एसी वाहनाची खास सोय. मुऱ्हा जातीच्या या रेड्याला महिन्याकाठी एक लाखांचा नुसता खुराकचं लागतो. भर-भक्कम शरीरयष्टी, देखणं रूप आणि 25 कोटी किंमत यामुळे हे जनावर नेमकं आहे तरी कसं हे पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची अक्षरशः रीघ लागली आहे.

अधिक वाचा  जनशक्ती पुढे महाशक्ती पराभूत! जैन बोर्डिंग व्यवहार रद्द होणार, नैतिकता अखेर जागृत व्यवहारातून बाहेर पडण्याचा विशाल गोखलेंचा निर्णय

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून दरवर्षी भीमा कृषी प्रदर्शनाचा आयोजन करण्यात येतं. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन विकसित झालेली बी-बियाणे तसेच पाळीव पशुपक्षी हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असतात. यंदा या कृषी प्रदर्शनात हरियाणातील पानिपतमधून नरेंद्र सिंह यांचा आमदार रेडा प्रमुख आकर्षण ठरत आहे. या रेड्याच्या देखरेखीसाठी दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार रेड्याचा दिवसभराचा खुराक कसा असतो?

– आमदार रेड्याच्या शारीरिक मसाजसाठी एक जण तर चारा आणि देखभालीसाठी एक जण.

– आमदाराला दिवसाला 20 लिटर दूध, 20 किलोफिड आणि 30 किलोंचा चारा आणि भुसा या रेड्याचं दिवसभराचं अन्न आहे.

अधिक वाचा  नवे सरन्यायाधीश म्हणून यांच्या नावाची आज शिफारस; सरन्यायाधीश CJI भूषण गवईंनी नावही सांगितले

– दिवसभरातून तीन वेळा रेड्याला आंघोळ घातली जाते.

– वातानुकूलित कक्षातच रेड्याची देखरेख दररोज राखली जाते.

नरेंद्र सिंग यांच्याकडे आमदार आहे म्हटल्यानंतर मंत्री देखील असणारच. आमदार नावाच्या रेड्याच्या लहान भावाचं नाव त्यांनी मंत्री असं ठेवलं आहे.

खासदार धनंजय महाडिक यांच्या मातोश्रीने देखील या रेड्याची पाहणी केली. हा किती वर्षा वर्षाचा आहे, त्याचे दात किती आहेत, त्याचा खुराक काय असतो ही सगळी माहिती त्यांनी घेतली.

जगातील सर्वात महागडा आणि महाकाय रेडा म्हणून या रेड्याची ओळख आहे. सात वेळा तो वर्ल्ड चॅम्पियन झाला आहे. त्यामुळे या रेड्याला पाहण्यासाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून शेतकरी या कृषी प्रदर्शनाला भेट देत आहेत.

अधिक वाचा  महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण दुर्देवी न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार