दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा ‘हात’भार; केजरीवाल, सिसोदियांसह ‘आप’च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस

0

गेल्यावर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील काँग्रेसच्या नेतृत्वात प्रादेशिक पक्षांनी एकत्र येत भाजपच्या आव्हानाचा मुकाबला केला होता आणि भाजप लोकसभा निवडणुकीमध्ये 400 चा नारा देत असताना अवघ्या 240 जागांवर येण्याची वेळ आणली होती. बहुमत सुद्धा भाजपला मिळवता आलं नाही. केंद्रामध्ये भाजपची एकहाती सत्ता अपेक्षित असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाली हा इतिहास असताना गेल्या आठ महिन्यांमध्ये मात्र ज्या पद्धतीने इंडिया आघाडीने वज्रमूठ बांधत भाजपला दणका दिला होता तीच वज्रमूछ निखळल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या आठपैकी सहा राज्यांमध्ये भाजपने विजय प्राप्त करत इंडिया आघाडीची हवा काढली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. देशभरामध्ये इंडिया आघाडीमध्ये समन्वय राहिला नसल्याचे दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्येही स्पष्ट झालं आहे.

एकमेकांची कपडे फाडण्यातच इंडिया आघाडीच्या नेत्यांचा वेळ गेला

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि आप आमने-सामने आल्याने त्याचा फायदा भाजपसाठी झाल्याचे दिसून येत आहे. दिल्लीची सत्ता भाजपने पुन्हा एकदा मिळवताना ‘आप’ला सत्तेतून बेदखल केलं आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यासारखे दिग्गज नेते पराभूत झाले. त्यांच्या पराभवासाठी काँग्रेसची मते सुद्धा कारणीभूत ठरली आहेत. ज्या 12 जागांवर आपचा पराभव झाला त्यामध्ये काँग्रेसला मिळालेली मतं ही भाजपच्या विजयी मतांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे कदाचित हे दोन्ही पक्ष समन्वयाने एकत्रित लढले असते तर भाजपला सत्ता मिळवता आली नसती, असे दिसून येत आहे. नवी दिल्ली, छत्रपूर, जंगपुरा बादली, त्रिलोकपुरी, ग्रेटर कैलास, नांगलोई, तिमारपूर मालवीय नगर, राजेंद्र नगर, संगम विहार, दिल्ली केंट या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या विजयी मतांपेक्षा काँग्रेसला मते मिळालेली सर्वाधिक आहे. त्यामुळे कदाचित या जागांवर काँग्रेस आणि आपमध्ये आघाडी असती, तर या जागा आपच्या पदरामध्ये किंवा काँग्रेसच्या पदरात आल्या असत्या हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आप आणि काँग्रेस मधील हे वादामुळेच भाजपचा दिल्लीतील विजय सुकर झाला आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

त्यामुळे एक प्रकारे एकमेकांची कपडे फाडण्यातच इंडिया आघाडीच्या नेत्यांचा वेळ जात असल्याने भाजपच्या महाकाय आव्हानाचा मुकाबला करणार तरी कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जागावाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये कमालीचा वाद निर्माण झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामध्ये फक्त सत्तेत येण्याचीच औपचारिकता अशा पद्धतीनेच भांडणे सुरू होती. या भांडणाचाच फटका तिन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीमध्ये बसला. यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. फक्त झारखंडमध्ये इंडिया आघाडीला सरकार स्थापन करता आलं आहे.

अधिक वाचा  हवामान विभागाकडून नकोसा इशारा जारी…अवकाळीचा वादळी मारा सोसण्यासाठी तयार राहा!

सर्व राजकीय परिस्थिती विपरीत असताना सुद्धा हरियाणामध्ये भाजपची सत्ता

तत्पूर्वी, मध्य प्रदेश निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसचा अहंकार काँग्रेससाठी नढला होता. त्या ठिकाणी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव काही जागांची मागणी करत असताना त्यांना देण्यासाठी काँग्रेसकडून नकार देण्यात आला. त्याचाच परिपाक विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून आला. इतकेच नव्हे तर काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी कोण अखिलेश म्हणून अशी संभावना केली होती. त्यावेळी सुद्धा काँग्रेसला सत्तेत परतणार असल्याचा विश्वास होता. मात्र, मी काँग्रेसचा त्या ठिकाणी सुद्धा पराभव झाला. इतकेच नव्हे तर सर्व राजकीय परिस्थिती विपरीत असताना सुद्धा हरियाणामध्ये भाजपने सत्ता मिळवली. या ठिकाणी सुद्धा काँग्रेसच्या अंतर्गत लाथाळ्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्या.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७४१ च्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

इंडिया आघाडीमधील मतभेद वाढले

त्यामुळे इंडिया आघाडीमधील मतभेद हे भाजपच्या विजयासाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा फारच बोलकी असल्याचे दिसून आले. अजून आपसात लढा म्हणत इंडिया आघाडीला टोला दिला. अर्थात, जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्ता आल्यानंतर अब्दुल्ला यांचा सूर बदलला आहे. त्यानंतर शिवसेना संजय खासदार संजय राऊत यांनी सुद्धा त्यांच्याच सुरात सूर मिसळला. त्यामुळे इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्षातील नेत्यांचे मतभेद आणि काँग्रेसचा अहंकार यामध्ये सत्तेचा महामार्ग रखडला गेला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांनी आम्ही इंडिया आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीत एकत्र होतो, पण आता नाही. आघाडीची स्थापना केल्यापासून ती राज्यांत चालणार नाही, हे स्पष्ट होते. त्याची कार्यप्रणाली राज्यांच्या राजकीय स्वभावावर अवलंबून असेल. त्यामुळे इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून वाचू नये, आणि त्याचा आनंदही साजरा करु नये, असे म्हटले होते.