अहिल्यानगर इथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. मात्र या अंतिम लढतीतील पंचांचा निर्णय न पटल्याने महेंद्र गायकवाडने दुसऱ्या फेरीनंतर कुस्तीत सहभागी होण्यास नकार दिला. त्यानंतर पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित करण्यात आले आणि महेंद्र गायकवाडवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.






आज महेंद्र गायकवाड पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या हिंदु गर्जना चषक कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आला, तेव्हा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकार्यांनी त्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत झालेल्या प्रकाराबद्दल लिखित स्वरुपात माफी मागायला सांगितलं.
महेंद्र गायकवाडच नाव असलेलं माफीनाम्याचे पत्र कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकार्यांनीच तयार करुन ठेवले. त्यावर महेंद्रला सही करायला सांगण्यात आले. मात्र महेंद्रने त्याला नकार दिला. असं राजकारण होत राहिलं तर कुस्ती संपायला वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया त्याने दिलीय.
माफीनामा पत्रात काय लिहिले होते?
माफीनामा पत्रात लिहिले होते की, मी नुकत्याच अहील्यानगर येथे झालेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापुर जिल्हा कुस्तीगीर संघाकडुन महाराष्ट्र केसरी माती विभात सहभागी झालो होतो. माती विभागामध्ये मी प्रथम क्रमांक मिळवला, त्यानंतर महाराष्ट्र केसरी कीतावासाठी माझी लढत पृथ्वीराज मोहोळ सोबत झाली. या लढतीमध्ये कुस्ती संपण्यास 16 सेंकद वाकी असताना माझ्याकडुन गैरसमजुती कुस्ती सोडुन देण्यात आली. तसेच कुस्ती संपल्यानंतर माझ्याकडुन पंचाना मोठ्या आवाजात अरेरावी करण्यात आली, सर्व प्रकार माझ्या गैरसमजुतीमधुन झाला असुन मी त्यावर दिलगिरी व्यक्त करतो.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असुन 3 वर्षासाठी बंदी करण्यात आलेली आहे. मी आपणास या पत्राव्दारे विंनती करतो की आपण पुणे येथे होत असलेल्या राज निमंत्रित हिंदु गर्जना चषक या स्पर्धेत सहभाग घेण्यास परवानगी द्यावी.











