नाराज असलेले माजी मंत्री छगन भुजबळ हे लवकरच राष्टवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसापासून रंगल्या आहेत. नाराज असल्याने त्यांची भाजपशी जवळीकता वाढत असल्याची चर्चा असतानाच आता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्न औषध व प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मोठे विधान केले.नाराज असलेले छगन भुजबळ हे खूप मोठ्या मनाचे नेते आहेत. त्यामुळे ते कदापि राष्ट्रवादी सोडून येत्या काळात भाजपसोबत जाणार नाहीत, असे सांगत या सुरु असलेल्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.






मंत्री नरहरी झिरवळ यांनी बोलताना हे मोठे विधान केले. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. नुकत्याच शिर्डी येथे पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीला छगन भुजबळ काही वेळ उपस्थित हॊते. शिर्डीत ते काही वेळ थांबून निघून गेले होते. त्यामुळे भुजबळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असतांना त्यांनी मोठे विधान केले आहे.
यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही ? यावर बोलताना झिरवळ म्हणाले, ‘धनंजय मुंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणाशी त्यांचे कसलेच लागेबांधे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यासोबतच या हत्या प्रकरणाशी संबंध आढळला तर त्यांनी फासावर जाण्याची तयारी देखील दर्शवली आहे. जोपर्यंत कोर्ट त्यांना दोषी ठरवत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही, असेही झिरवळ यांनी स्पष्ट केले.
राज्य मंत्रिमंडळात माझ्याकडे सध्या तीन खात्याचा कारभार आहे. या तीन खात्याच्या माध्यमातून नागरिकांना लोकोपयोगी सुविधा पोहचविण्याचा माझा प्रयत्न आहे. येत्या काळात अन्न व दुधातील भेसळ टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दुधामध्ये भेसळ केली जात असल्याचे काही ठिकाणी तपासणी केल्यानंतर पुढे आले आहे. काही ठिकाणी सॅम्पल घेऊन तपासणी केल्यानंतर हा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे दोषी आढळलेल्या मंडळींवर कारवाई केली जात असल्याचे झिरवळ यांनी स्पष्ट केले.
महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्र्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये कसलाच समन्वयाचा अभाव नसल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीमधील तीन पक्ष एकत्रित मिळून निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.











