गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागांत मुसळधार पावसामुळे शेतीकामात अडथळे निर्माण झाले होते.मात्र, आता हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होणार असून, मशागत व खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची ‘उघडीप’ मिळणार आहे.
हीच यादरम्यान शेतीच्या तयारीसाठी एक सुवर्णसंधी ठरू मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर हवामानाचा अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती आहे. माणिकराव खुळे (नि. हवामानतज्ज्ञ, IMD पुणे) यांच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरताना दिसणार असून, शेतकऱ्यांना मशागत व पेरणीसाठी आवश्यक अशी उघडीप मिळण्याची शक्यता आहे.
पावसाचा जोर ओसरणार
आज (२९ मे) पासून ते ३ जून या कालावधीत मुंबई व कोकण वगळता महाराष्ट्रातील इतर २९ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हळूहळू कमी होईल.
मुंबई व कोकणात मात्र सोमवार, २ जूनपर्यंत पावसाचा जोर टिकून राहणार आहे.
इतर भागात पावसात थोडीशी विश्रांती मिळेल, जी शेतीसाठी फायदेशीर ठरेल.
पावसाचा खंड नाही, पण ‘उघडीप’ मिळणार
- ३० मे ते १० जून या काळात, महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उघडीप मिळणार आहे.
- मान्सूनची वाटचाल सुरळीत राहणार असून, त्यात कोणताही अडथळा येणार नाही.
- ज्या भागांत आतापर्यंत भरपूर पाऊस झाला आहे, तिथे वाफसा स्थितीत मशागत व पेरणीसाठी योग्य हवामान उपलब्ध होणार आहे.
- ही उघडीप १०-१२ दिवस टिकू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे सुरू ठेवावीत.
मान्सूनची सद्यस्थिती
- पुणे आणि मुंबईत पोहोचलेला मान्सून सध्या नगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी तसेच विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोलीच्या दक्षिण भागांपर्यंत पोहोचला आहे.
- मात्र, पालघर, नाशिक, खान्देश, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अजून मान्सून झेप घेतलेली नाही.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
आतापर्यंत चांगला पाऊस झालेल्या भागांमध्ये मशागत व पेरणीस सुरूवात करता येईल. मात्र ज्या भागांत मान्सून अद्याप पोहोचलेला नाही, तिथे पेरणीची घाई टाळावी. पावसाची ‘उघडीप’ ही एक संधी असून, त्याचा शास्त्रोक्तरीत्या आणि नियोजनपूर्वक वापर करावा.
यावर्षी मान्सूनची वाटचाल तुलनेत झपाट्याने होत असून, पावसातील ही ‘विश्रांती’ शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरू शकते. आता काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध मशागत सुरू करण्याचा योग्य काळ आहे.
– माणिकराव खुळे निवृत्त IMD Pune.