मुंबई : राज्यातील 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेध आता विद्यार्थ्यांना लागले असून अभ्यासाची तयारीही सुरू आहे. राज्य शासनाने यंदाची बोर्ड परीक्षा अधिक गांभीर्याने घेतली असून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी आता महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कॉपीमुक्त परीक्षांसाठी सरकारने राज्यातील काही संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांवेळी स्थानिक गुंडगिरी व स्थानिक यंत्रणांवर दबाव टाकून परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस येतात. या कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यातील दहावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.






दहावी बारावी बोर्ड परीक्षा दरम्यान संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जाणार आहे. बोर्ड परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनाकडून व्हिडिओ चित्रीकरण केलं जाणार आहे. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची (FCR) व्दारे म्हणजे फेस रिडींगद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी बोर्डाकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रावर व आसपासच्या परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन द्वारे निगराणी केली जाणार आहे. परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण देखील करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके उपलब्ध होतील याचेही नियोजन करण्यात येणार आहे.












