भाजप महायुतीत कंट्रोल आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. त्याच कारण म्हणजे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री असला किंवा शिवसेनेचा पालकमंत्री तरीही तेथे भाजप आपल्या एका मंत्र्यांची संपर्कमंत्री म्हणून नेमणूक करणार आहे.भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा मंत्री संपर्कमंत्री म्हणून काम पाहणार आहे.
एकनाथ शिंदे यांचा बाल्लेकिल्ला असलेल्या ठाण्यात आणि बीड जिल्ह्यातही भाजपने संपर्कमंत्र्याची नेमणूक केलीय. त्यामुळे महायुतील दोन्ही पक्षातील नेते यावर कशा प्रतिक्रिया देतात ते पाहावं लागेल. आज झालेल्या आमदारांच्या कार्यशाळेत भाजपने या नियुक्त्या केल्या आहेत. सरकार आणि संघटनेत समन्वयासाठी भाजपकडून संपर्कमंत्र्यांच्या विशेष नेमणुका करण्यात आल्या आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक हे संपर्कमंत्री असणार आहेत. तर बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यावर संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आलीय. तर संभाजीनगरमध्ये अतुल सावे संपर्कमंत्री असणार आहेत. मात्र यामुळे आधीच पालकमंत्रिपदावरून सुरू असलेला वाद अजून पेटण्याची शक्यता आहे. रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्रिपदावरून युतीत गोंधळ उडायलाय. दरम्यान भाजपने आपल्या मंत्र्यांवर संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी दिलीय. भाजपचा पालकमंत्री नसला तरी तेथे भाजपचा हस्तक्षेप असणार आहे.
सरकार आणि संघटनेत समन्वयासाठी भारतीय जनता पक्षाकडून विशेष नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात संपर्कमंत्री काम करणार आहेत. पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये तीव्र संघर्ष सुरू असताना संपर्कप्रमुख हे नवे पद भाजपने निर्माण केलेले आहे. संपर्कमंत्री नेमून अप्रत्यक्षपणे मित्रपक्षाच्या पालकमंत्र्यांवर धाक राहावा, यासाठी भाजपने मोठी चाल खेळल्याची चर्चा आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला हा शह देण्याचाही भाजपचा प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आपल्यालेच मिळावे, असा राजकीय नेत्यांचे प्रयत्न असतो. सरकार स्थापन झाल्यानंत, असे मंत्रिपदासाठी आणि चांगल्या खात्यासाठी जसे प्रयत्न झाले तसे स्व जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळावे, यासाठीही नेत्यांनी पराकोटीचे प्रयत्न केले. परंतु तरीही तिन्ही पक्षातले काही नेते नाराज झाले आहेत. भाजपमधील नाराजी शमविण्यासाठी आणि पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या कामासाठी भाजपने संपर्कमंत्री हे नवे पद निर्माण केल्याचे सांगितले जाते.
संपर्कमंत्र्यांवर कोणत्या कामाची जबाबदारी असेल?
पालकमंत्रिपदाच्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संपर्कमंत्री हे नवे पद निर्माण करून कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यावर पक्षाचा भर असेल. पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेचे कोणतेही काम अडू नये तसेच सरकारमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचाही सहभाग असावा, यासाठी संपर्कमंत्री प्रयत्न करतील, असे सांगण्यात येते.
ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही, तिथे जाऊन संपर्कमंत्री कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतील. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू असताना युतीच्या राजकारणात कार्यकर्त्यांचा बळी जाऊ नये वा त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
जिल्हा आणि संपर्क मंत्री
गोंदिया – पंकज भोयर
रायगड – नितेश राणे
बुलढाणा – आकाश फुंडकर
यवतमाळ – अशोक उईके
वाशीम – राधाकृष्ण विखे
संभाजीनगर – अतुल सावे
बीड – पंकजा मुंडे
धाराशिव – जयकुमार गोरे
हिंगोली – मेघना बोर्डीकर
जळगाव – गिरीश महाजन
नंदुरबार – जयकुमार रावळ
मुंबई शहर – मंगलप्रभात लोढा
ठाणे – गणेश नाईक
रत्नागिरी – आशिष शेलार
कोल्हापूर – माधुरी मिसाळ
पुणे – चंद्रकांत पाटील
महायुतीत नाराजी?
सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली होती. त्यावरून महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीत गृहप्रकल्पांवर चर्चा होणार होती. यासंबंधित खाते एकनाथ शिंदे यांच्याजवळ आहे. पण तेच बैठकीला उपस्थित नव्हते.