ईशा फाऊंडेशचे संस्थापक सदगुरु जग्गी वासुदेव यांना मद्रास हायकोर्टाने एक प्रश्न विचारला आहे. वासुदेव यांनी स्वत:च्या मुलीचं लग्न करुन दिलं, मग दुसऱ्यांच्या मुलींना संन्यासी राहण्यासाठी का प्रोत्साहित करत आहात? असा सवाल न्यायमूर्ती एसएम सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती वी शिवगमन यांच्या खंडपीठाने विचारला आहे. एका निवृत्ती प्रोफेसरने जग्गी वासूदेव यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. ज्या व्यक्तीने स्वत:च्या मुलीचा विवाह लावून दिला आणि तिला आयुष्यात चांगल्या पद्धतीने स्थापित केलं, ती व्यक्ती दुसऱ्यांच्या मुलींना मुंडन करून संन्यासीचे जीवन जगण्यास का प्रोत्साहन देत आहेत? हे जाणून घ्यायचं असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.
ईशा फाऊंडेशवर मुलींचं ब्रेनवॉश करण्याचा आरोप
जग्गी वासुदेव यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करणाऱ्या निवृत्त प्रोफेसरने गंभीर आरोप केले आहेत. आपल्या दोन उच्चशिक्षित मुलींना ईशा योगा सेंटरमध्ये कायमचं राहाण्यासाठी त्यांचं ब्रेनवॉश करण्यात आलं. कोईम्बतूरच्या तामिळनाडू एग्रीकल्चर युनिव्हर्सिटीत शिकवणारे एस कामराज यांनी हाय कोर्टाकडे आपल्या मुलींची केंद्रीत सुटका करण्याची विनंती केली आहे. कामराज यांच्या एका मुलीचं वय 42 तर एका मुलीचं वय 39 आहे. दोन्ही मुलींना कोर्टात हजर राहण्यासा सांगितलं होतं. यावेळी आपल्यावर कोणताही दबाव नसून स्वेच्छेने ईशा योगा केंद्रात रहात असल्याचं त्यांनी सांगितलं.
दोन मुलींनी आपल्या आयुष्याचा मार्ग निवडण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतला असेल तर त्याबाबत चिंता व्यक्त करण्याचं कारण नाही असा युक्तीवाद ईशा फाऊंडेशनच्या वकिलांनी केली. यावर कोर्टाने आम्ही कोणाच्या बाजूने किंवा विरोधात नाही पण प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे असं उत्तर दिलं.
वडिलांचे गंभीर आरोप
निवृत्त प्रोफेसर एस कामराज यांनी ईशा योग केंद्रात आपल्या मुलींना असं जेवण आणि औषधं दिली जातात, ज्यामुळे त्यांची विचार करण्याची क्षमता कायमची गेली आहे असा आरोप केला आहे. कामराज यांच्या मोठ्या मुलीने ब्रिटेनच्या युनिव्हर्सिटीतून एमटेक केलं आहे. 2008 मध्ये घटस्फोटानंतर तीने योगा क्लासेस सुरु केले. त्यानंतर लहान बहिणीबरोबर ती कोईम्बतूरमधल्या ईशा योग केंद्रात आली. आता दोघीही तिथेच राहातात असं एस कामराज यांनी म्हटलं आहे.