कामोठे दि. २९ (अधिराज्य) पुष्प कॉर्नर हौसिंग सोसायटी, सेक्टर १२, कामोठे यांच्या वतीने २६ जानेवारी २०२५ रोजी सोसायटी प्रांगणात ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन दीपक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.






सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण मोरे व सूनय कोटकर यांनी आपल्या भारदस्त आवाजात अत्यंत सुसुत्रतापणे केले. महिला या शक्तीस्त्रोत असून महिला आहेत म्हणूनच पुरुष जन्माला येऊ शकतो ही भावना आणि महिला सशक्तीकरण ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यासाठी सोसायटीतील सर्व महिला सभासद, भगिनी, सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सभासद ध्वजारोहण कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते, सर्वांच्या उपस्थितीत सौ. करुणा सुरेश भगत, सौ. शोभा ठाकूर, सौ. जयश्री कदम यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. सोसायटीतर्फे सर्व आजी-माजी कार्यकारिणी सभासद यांना पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर प्रसंगी सोसायटीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्या अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले ज्यात आबालवृद्धानी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सरतेशेवटी प्रविण मोरे व सूनय कोटकर यांनी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या व कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानून राष्ट्रगानाने कार्यक्रमाची सांगता केली.











