पुण्यात वाढत्या गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रूग्णसंख्या आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन याबाबत लवकरच एसओपी जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे. पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे.






याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले दुर्मिळ रोग पण बहुतेक रुग्ण बरे होतात. गुलेन बॅरी सिंड्रोम संसर्गजन्य रोग नाही.111 रुग्ण पुण्यात आहेत.80 रुग्ण हे 5 किलोमीटरच्या परिघात आहेत. 35,000 घरे आणि 94,000 नागरिकाच्या चाचण्या होणार आहेत. एनआयव्हीची (NIV) मदत घेतली जाते आहे. एक मृत्यू झाला आहे. तो अद्याप गुलेन बॅरी सिंड्रोम मुळेच झाला याची अजून पुष्टी झालेली नाही.
पुण्यात 31 मार्चला भारत-इंग्लंड मॅच आहे. तेथे पिण्याच्या पाण्याकडे लक्ष द्या. हा विकार पिण्याचे पाणी दूषित असेल तर किंवा न शिजवलेले अन्न/मांस खाल्ल्याने होतो. त्यामुळे बाहेरचे अन्न टाळा. पाणी उकळून प्या. घाबरून जाण्यासारखी स्थिती नाही. जे उपचार आहेत, ते महात्मा फुले जनारोग्य योजनेत समाविष्ट आहेत. शासकीय रुग्णालयात उपचाराची विशेष व्यवस्था निर्माण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
विहिरीतील दूषित पाण्यामुळेच जीबीएस आरोग्यमंत्री
पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या वाढली असून आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण हे नांदेड परिसरात पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या विहिरीच्या परिसरातील आहेत. या विहिरीतील दूषित पाण्यामुळेच हे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काल (सोमवारी, ता, 27) दिली आहे. नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहे. राज्यातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळण्याची गरज आहे. या दृष्टीने आरोग्य विभागाकडून नियमावली तयार केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
काय काळजी घ्यावी
पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?
दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.











