आदित्य ठाकरेंच नेतृत्व आता शिवसेना ‘टफ कॉल’? नाही म्हटलं तरी उद्धव ठाकरे यांना या सर्व मर्यादा

0

शिवसेना पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठी सहानुभूती मिळाली.पण त्या सहानुभूतीचं मतात रुपांतर झालं नाही. एकनाथ शिंदेंनी आमदार खासदारांसह केलेल्या बंडाला आता पावणे तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. या कालावधीत लोकसभा आणि विधानसभा अशा दोन मोठ्या निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकीत एकनाथ शिंदेंची शिवसेना ठाकरेंवर भारी पडल्याचं दिसून आलं. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा उभारी घेण्यासाठी काही टफ कॉल घेण्याची आवश्यकता आहे.

आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभेतील यशानंतर आता एकनाथ शिंदेंनी जोरदार तयारी सुरू केली आहे. खरंतर शिवसेनेला अपयश काय नवं नाही. मोठ्या अपयशानंतर शिवसेनेनं पुन्हा जोरदार मुसंडी मारल्याचं यापूर्वीही अनेकदा पाहायला मिळालं आहे. काही वर्षांपूर्वी शिवसेनेची ‘हीच ती वेळ’ अशी टॅगलाईन प्रचंड गाजली होती. तीच टॅगलाईन आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी परफेक्ट मॅच होऊ शकते.

एकीकडे भाजपसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंचे बडे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षातल्या इनकमिंगसाठी जोर लावत आहे. त्यामुळे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या जिल्ह्यातच ठाकरेंना एकावर एक मोठे धक्के गेले काही वर्षे बसत आहे. उद्धव ठाकरे राजकीय सभा किंवा एखाद्या महत्त्वाच्या घटनेसंबंधी पत्रकार परिषदांमधून अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे वेगवेगळ्या शस्त्रक्रियांमुळे त्यांच्या दौरे, भेटीगाठी, सभा, मेळावे, बैठका यांना कितीही नाही म्हटलं तरी मर्यादा आल्या आहेत.

आदित्य ठाकरेंचं पक्षनेतृत्व पुढं आणण्यास योग्य वेळ

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

ज्या जोमानं इतर प्रतिस्पर्धी राजकीय पक्ष मुंबई,पुणे अशा महत्त्वाच्या महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारी करत आहे. त्याप्रमाणात उद्धव ठाकरेंकडे शिल्लक राहिलेली नेतेमंडळी,तळ्यात मळ्यात असलेले कार्यकर्त्यांना एका भक्कम आणि तितकाच आक्रमक व तरुण नेतृत्वाची गरज आहे. अशातच युवासेनेसह शिवसेनेची प्लस मायनस पाहिलेल्या आदित्य ठाकरेंचं पक्षनेतृत्व म्हणून पुढं आणण्यासाठी हीच ती योग्य वेळ असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कधी ना कधी राजकीय पक्ष,संघटना यांच्या अस्तित्वासाठी नवं परिवर्तनासाठी टफ कॉल हे घ्यावेच लागतात. संघटनात्मक बदलामुळे पक्ष किंवा संघटनेला संजीवनी मिळण्याची दाट शक्यता असते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ही आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात लढवली तर त्याचा शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता आहे.

दसरा मेळावा ही शिवसेनेची मोठा परंपरा राहिली आहे.त्यातच 2010 च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठा निर्णय जाहीर केला. या निर्णयानं राजकीय समीकरणं बदललीच शिवाय एका ठाकरे घराण्यातील नव्या पर्वाची सुरुवात झाली. बाळासाहेबांनी पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच 2010 च्या दसरा मेळाव्यात युवा सेनेची घोषणा केली. यावेळी आधीच बाळासाहेबांचा आदेश म्हणजे शिरसावंद्य मानणाऱ्या हजारो शिवसैनिकांच्या समोर आदित्य ठाकरेंकडे युवा सेनेची जबाबदारी सोपवली.

बाळासाहेब ठाकरेंनीच घोषणा केल्यामुळे आदित्य ठाकरेंची राजकीय एन्ट्री दमदार झाली.त्यांनी बाळासाहेबांसह समोरील शिवसैनिकांसमोर नतमस्तक होत ही जबाबदारी स्वीकारली. यानंतर बरोबर दोन वर्षांनी 2012च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्राला भावनिक साद घातली होती.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करत आहे. त्यांना सांभाळा,’ अशी घातलेली भावनिक साद शिवसैनिकांच्या आतमध्ये कोरली गेली.आणि सळसळतं रक्ताचा शिवसैनिकही या बाळासाहेबांच्या आवाहनानंतर गहिवरला गेला. प्रबोधनकार ठाकरेंनीही शिवसेनेच्या स्थापनेनंतर ‘माझा बाळ महाराष्ट्रासाठी अर्पण करत आहे,असे उद्गार काढले होते. त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्राने यावेळी पाहिली.

आदित्य ठाकरेंकडे प्रबोधनकार ठाकरे यांचे पणतू, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे ज्येष्ठ चिरंजीव असा समृध्द राजकीय वारसा असला तरी त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्याकडे आजोबा-पणजोबा आणि वडिलांसारखी वक्तृत्व शैली नसली तरी त्यांना कधी काय बोलायचं आणि किती बोलायचं याचा परफेक्ट कौशल्य आत्मसात आहे. त्यामुळेच पहिल्यांदा आमदार व मंत्री झाल्यानंतरही ते मी्डियासमोर असे कधी गडबडल्याचं दिसून आले नाही. किंवा त्यांच्या कुठल्या वादग्रस्त विधानांमुळेही ते अडचणीत आले नाही. किंवा पक्षाला कधी त्यांनी अडचणीत आणल्याचं आठवत नाही.

युवा सेनेच्या बांधणीचा मोठा अनुभव…!

आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेची भक्कम बांधणी केली. मुंबई,पुणे अशा मोठ्यात शहरांमध्येच मर्यादित न राहता खेडोपाड्यात गावागावांत युवा सेना पोहचवली. आपला जनसंपर्कही वाढवला. कार्यकर्त्यांना वेळ देणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं,त्यांच्या मदतीला धावून जाणं,मनमिळाऊ,तितकाच संयमी स्वभाव,यामुळे त्यांची तरुणाईमध्ये मोठी क्रेझही पाहायला दिसून येते. अभ्यासू व्यक्तिमत्व, उत्तम संघटन कौशल्य, दुरदृष्टी, यांच्या जोरावर त्यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना एवढ्या मोठ्या बंडानंतरही तग धरुन आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व आणि त्यांनी केलेल्या नियोजनामुळेच युवा सेनेला विद्यापीठात वर्चस्व निर्माण करता आलं होतं. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील वरळी मतदारसंघातून लढवण्याचं धारिष्ट्य दाखवलं.तसेच ती निवडणूक जिंकलीही. निवडणूक लढवणारे आणि जिंकणारे व मंत्रि‍पदाची शपथ घेणारे ते ठाकरे घराण्यातील पहिलेच व्यक्ती ठरले.

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना 40 आमदारांसह केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतरचा सर्वात मोठा धक्का म्हणजे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही ठाकरेंकडून गेलं. आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीवेळी अनेक मोठे नेते ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत गेले. त्यातच लोकसभेला जेमतेम यशानंतर आणि विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकापाठोपाठ धक्के बसत आहे.

उद्धव ठाकरेंच्या साथ सोडलेल्या अनेक नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. यात अनेक दशके ठाकरेंसोबत काढलेल्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही त्यांच्या कार्यपध्दतीवर, नेतृत्वावर, निर्णयांवर सवाल उभे केले. याचमुळे कुठेतरी उद्धव ठाकरेंची शिवसेना खिळखिळी वाटू लागली आहे.

त्याचमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी शिवसेनेला आता तरुण आणि दिवसरात्र पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून काढणार्‍या नेतृत्वाची गरज असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. एकीकडे युवासेनेचा बांधणीचा अनुभव पाठीशी असलेल्या आदित्य ठाकरे शिवसेनेला पुन्हा उभारणी देण्यासाठी परफेक्ट नेतृत्व ठरु शकतात.