मुंबई : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडानंतर महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण ढवळून निघालंय. पोलीस, सीआयडी, एसआयटीकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि याच प्रकरणातला सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे नाशिकमध्ये…






होय, बीडमध्ये घडलेल्या या हत्याकांड प्रकरणाला कलाटणी देऊ शकणारा हा पुरावा आहे आरोपी विष्णू चाटेचा मोबाईल… देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक झाली असून त्यांच्याकडून एकूण 5 मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र या प्रकरणातला सर्वात महत्त्वाचा मोबाईल आहे विष्णू चाटे याचा… आणि हाच मोबाईल विष्णू चाटेनं नाशिकमध्ये फेकल्याचं समजतंय.
चाटेचा मोबाईल ‘पिक्चर क्लिअर’ करणार!
फरार असताना विष्णू चाटेनं मोबाईल नाशिकमध्ये फेकल्याची माहिती त्याने स्वत:च पोलिसांना दिली आहे. मात्र त्याने मोबाईल नेमका कुठे फेकला आहे हे त्याला आठवत नाहीये. पोलिसांकडून चाटेच्या मोबाईलचा कसून शोध सुरू आहे. विष्णू चाटेच्या याच मोबाईलवरून खंडणीसाठी धमकी दिली गेल्याचे समोर आले आहे. खंडणी प्रकरणात हाच मोबाईल अतिशय महत्वाचा आहे. मोबाईल सापडल्यानंतरच महत्वाचे धागेदोरे स्पष्ट होणार आहेत. ‘25 दिवस अटकेत असलेल्याचा मोबाईल का सापडत नाही?’ असा खडा सवाल केज कोर्टाच्या सरकारी वकिलांनी विचारला आहे.
बीड प्रकरणात विष्णू चाटेचाच मोबाईल महत्त्वाचा आहे, त्याचं कारण म्हणजे विष्णू चाटेच्या याच मोबाईलवरुनच त्यानं वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय आहे. आणि त्याच मोबाईलवरुन खंडणीची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे विष्णु चाटेनं फेकलेला मोबाईल सापडणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
विष्णू चाटेचा मोबाईल उलगडणार कोडं!
विष्णू चाटेच्या फोनवरुन वाल्मिक कराड कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलला होता. त्यावरुन त्याने 2 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. तेव्हाच त्याने हातपाय तोडण्याची धमकी देखील दिली होती. या प्रकारच्या ऑडियो क्लिप पोलिसांना सापडल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळं तपासाला वेग येण्यासाठी विष्णू चाटे याचा फोन अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. मोबाईल शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे
तपास यंत्रणांनी आतापर्यंत इतर आरोपींकडून 5 मोबाईल जप्त केलेत. यातील एक मोबाईल जयराम चाटे आणि दुसरा महेश केदारचा आहे. तर इतर तीन मोबाइल कोणाचे आहेत, याबाबतही स्पष्टता नाही. अशातच हे सर्व मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले असून या मोबाईल्समधून काही मोठे खुलासे होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जातेय.
सरपंच देशमुखांची हत्या प्रकरणात कोयता, वायर, काठी जप्त करण्यात आली आहे. तसेच पाच मोबाइलही जप्त केले. हे अत्यंत महत्त्वाचे पुरावे आतापर्यंत हाती लागलेत. मात्र ज्या मोबाईलमध्ये या प्रकरणाचं गूढ दडलंय तो मोबाईल नाशिकमध्ये असून तो लवकरात लवकर शोधणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.












