लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजय पाटील यांनी उमेदवारीसाठी विधानसभेच्या तोंडावर भाजपची साथ सोडली होती. त्यांनी थेट कट्टर विरोधक राहिलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.मात्र, लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यांचा आर.आर. पाटलांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी धक्कादायकरित्या पराभव केला. आता संजयकाका पाटील हे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सांगलीच्या राजकारणात जोर धरू लागली आहे.






विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये जागावाटपात अदलाबदलीचे खेळ सुरू झाल्यानंतर महायुतीत ज्या पक्षांविरोधात आतापर्यंत लढण्याची वेळ आली,आता त्याच पक्षातून इच्छुकांनी उमेदवारी मिळवली. तसाच प्रकार सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात मोठा राजकीय उलटफेर झाला असून विधानसभेच्या उमेदवारीसाठी भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं वातावरण मानावलेलं दिसून येत नाही. ते लवकरच अजितदादांची साथ सोडणार असल्याचं चित्र आहे.
तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या संजयकाकांची पावले पुन्हा एकदा भाजपच्या दिशेनं पडत असल्याची चर्चा आहे. त्यांनी बुधवारी (ता.8) झालेल्या भाजप सदस्य नोंदणी अभियानासाठी पूर्ण ताकदीनं काम करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचमुळे ते लवकरच अजित पवारांना धक्का देण्याच्या मानसिकतेत असल्याची चर्चा झडू लागली आहे. अद्यापही संजयकाकांनी आपल्या पुढील राजकीय भूमिकेविषयी कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
संजयकाका पाटलांची लोकसभा निवडणुकीतील विजयाच्या हॅट्ट्रिकची संधी अपक्ष लढलेल्या पण मुळच्या काँग्रेसच्या विशाल पाटलांनी चुकवली. पण या पराभवानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली. यात महायुतीत त्यांनी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून तिकीटासाठी भाजप सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, याही निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीतील सलग पराभवामुळे संजयकाकांचं राजकीय भवितव्य धोक्यात आलं आहे. त्यांचे समर्थकही सध्या अस्वस्थ असल्याचं दिसून येत आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेल्या संजयकाका पाटील यांनी कार्यकर्त्यांना बुस्टर डोस देण्यासाठी बुधवारी (ता.8) महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी मुलगा प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सदस्य नोंदणी अभियान जोरदारपणे राबविण्याच्या सूचना केल्या. मतदारसंघात कमीत कमी 60 हजार सदस्य नोंदणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट संजयकाकांनी कार्यकर्त्यांना दिलं आहे. यामुळेच ते पुन्हा भाजपमध्ये परतणार असल्याची चर्चा आहे.










