वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं; खंडणी प्रकरणाच्या तपासाला वेग

0
1

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मिक कराड यांच्याभोवतीचा चौकशीचा फास दिवसेंदिवस आवळला जात आहे. वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात गुन्हा दाखल नसला तरी या सगळ्याचे मूळ असणाऱ्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरु आहे. वाल्मिक कराड याने पवनचक्कीची निर्मिती करणाऱ्या आवादा एनर्जी या कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. वाल्मिक कराड याने आरोपी विष्णू चाटे याच्यामार्फत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. नंतर विष्णू चाटे हाच आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन वाल्मिक कराड यांना भेटण्यासाठी गेला होता, असा आरोप आहे. त्यादृष्टीने आता पोलीस तपास करत असून त्यांनी विष्णू चाटे याचे व्हॉईस सॅम्पल्स घेतले आहेत.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

विष्णू चाटेचा मोबाईल अद्याप पोलिसांना सापडलेला नाही, त्याचाही तपास सध्या सुरु आहे. त्याच खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचे सुद्धा व्हॉईस सॅम्पल तपासले जाणार आहेत. मस्साजोग येथील आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यास दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी विष्णू चाटेचे व्हाईस सॅम्पल सीआयडीकडून कलेक्ट करण्यात आले आहेत. वाल्मिक कराडने अधिकाऱ्यांकडून किती खंडणी मागितली, त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले, याचा उलगडा या सगळ्यातून होऊ शकतो. तर वाल्मिक कराड याचेही व्हाईस सॅम्पल घेऊन ते मॅच होतात का हे तपासले जाणार आहेत. त्यामुळे या तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

दरम्यान, पवनचक्की मालकांना खंडणीसाठी येणाऱ्या धमक्यांसंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला असल्याचीही माहिती आता समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चार दिवस आधीच शरद पवार यांनी हा फोन केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन शरद पवार यांना दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने दिली.

सीआयडीकडून वायबसे दाम्पत्याची पुन्हा चौकशी

संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुन्हा संभाजी वायबसे व सुरेखा वायबसे या दोघांची सीआयडीकडून पुन्हा चौकशी होणार आहे. यापूर्वीही संभाजी वायबसे आणि सुरेखाबाई वायभसे यांची सीआयडीने चौकशी केली होती, मात्र त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले होते. आम्ही पुन्हा गरज लागल्यास तुम्हाला चौकशीला बोलावून घेऊ, असे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी वायबसे दाम्पत्याला सांगितले होते. या हत्या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. त्याच्या तपासासंदर्भात वायबसे दाम्पत्याची चौकशी होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. आरोपी सुदर्शन घुले आणि सांगळे यांना शोधून काढण्यात वायबसे दाम्पत्याने दिलेली माहिती महत्त्वाची ठरली होती.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य