अजित पवार हे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत उच्चांकी मतांनी निवडून येणाऱ्या नेत्यांत ते आघाडीवर आहेत. असे असताना ते निवडणुकीपासून म्हणजेच उमेदवारीपासून दूर गेले तर काय होईल, याची चर्चा रंगू लागली आहे. वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार यांनी वेगळी चूल मांडली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मुकुट परिधान करत त्यांनी साक्षात शरद पवार यांनाच ललकारले. मात्र त्यांची ही बंडखोर ललकारी राज्याला तर सोडाच, त्यांचे ‘होमग्राऊंड’ असलेल्या बारामतीच्या जनतेलाही आवडली नाही.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यातूनच त्यांनी पहिल्यांदा बहिणीच्या विरुद्ध पत्नीला उमेदवारी देण्याचा निर्णय चुकल्याचे मान्य केले. त्यापाठोपाठ कुटुंबाला सोडून चूक केल्याची दुसऱ्यांदा दिलेली कबुली आणि स्वतःच्या बारामती मतदारसंघातून विधानसभेला दुसऱ्या उमेदवारास संधी देण्याचे केलेले सूतोवाच… यामुळे अजित पवारांना नेमकं झालंय काय, असा प्रश्न पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यामुळे ते संभ्रमित झाले आहेत.
भावनिक आवाहनाला बळी पडू नका भीती की ‘गुगली”?
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे करण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला. ‘मागील ४० वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदान करा, भावनिक आवाहनाला बळी पडू नका,’ अशी भावनिक आर्त साद अजित पवार यांनी मतदारांना घातली. मात्र बारामतीच्या जनतेने त्याला दाद दिली नाही. या निवडणुकीत अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी सक्रिय सहभाग घेत सुप्रिया सुळे यांचा नेटाने प्रचार केला.
शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतच युगेंद्र पवार यांच्या विधानसभा निवडणुकीचा पाया पक्का केला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळेच बारामती विधानसभा मतदारसंघातून ‘काका विरुद्ध पुतण्या’ हे चित्र पुन्हा निर्माण होऊ न देण्यच्या उद्देशाने अजित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या बारामती मतदारसंघातून निवडणूक न लढण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले.
विधानसभा निवडणुकीतही लोकसभेची पुनरावृत्ती झाली तर पुढे काय, याची भीती अथवा बारामतीच्या जनतेला भावनिक साद घालण्यासाठी त्यांनी निवडणूक न लढवण्याचे सूतोवाच केले, हे यथावकाश निवडणुकीच्या तोंडावर स्पष्ट होईलच.
सतत दिलगिरी व्यक्त!
अजित पवार यांचा स्वभाव सडेतोड आहे. आत एक बाहेर एक, हा त्यांचा पिंड नाही. तू ‘निवडून कसा येतो तेच पाहतो’, ‘हा आमदार-खासदार कसा होतो तेच पाहतो’, ‘तुम्ही याला आमदार करा, मी मंत्री करतो’, ‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही,’ अशी धडाकेबाज आणि टाळ्या घेणारी, कार्यकर्त्यांना भुरळ घालणारी आणि पोटतिडकीने केलेल्या आवाहनाद्वारे कार्यकर्त्यांना कार्यप्रवण करणारी वक्तव्ये ही केवळ अजित पवारांच्या तोंडीच शोभतात.
अर्थात लोकसभा निवडणुकीत यातील अनेक वक्तव्यांचा पार पालापाचोळा झाला हा भाग निराळा. मात्र, अशा या धडाकेबाज नेत्याच्या तोंडी मागील दोन-तीन महिन्यांत वारंवार दिलगिरी येत असल्याने विरोधकांसह स्वपक्षीय नेते- कार्यकर्तेही आश्चर्यचकित झाले आहेत.
दुहेरी कात्रीत…
अजित पवार हे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत उच्चांकी मतांनी निवडून येणाऱ्या नेत्यांत ते आघाडीवर आहेत. असे असताना ते निवडणुकीपासून म्हणजेच उमेदवारीपासून दूर गेले तर काय होईल, याची चर्चा रंगू लागली आहे. जर राष्ट्रीय अध्यक्षांनाच निवडून येण्याची खात्री नसेल तर बाकीच्यांचे काय, असा आयता मुद्दा विरोधकांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला जाऊ नये अशी नेत्यांसह कार्यकर्त्यांची भूमिका आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीही याबाबत आपली स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे.
जर अजित पवार हे बारामतीतून लढणार असतील तर त्यांना शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या माध्यमातून घेरण्याची जोरदार तयारी केली जाईल. असे झाल्यास, अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अन्य उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग देण्यावर मर्यादा येणार आहेत. विरोधकांशी दोन हात करतानाच मित्रपक्षांच्या कुरघोडीवरही त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. उमेदवारी घेतल्यास संभाव्य दुष्परिणामांचाही विचार करावा लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी अजित पवार दुहेरी कात्रीत सापडल्याचे चित्र आहे.
अजित पवार यांच्या या तीन विधानांनी खळबळ
* लोकसभा निवडणुकीत बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे करून चूक झाल्याचे मान्य.
* कुटुंबातील फूट समाज स्वीकारत नाही. मीही तेच अनुभवले आहे. मी ही चूक मान्य करतो, असे वक्तव्य करत शरद पवार यांना सोडण्याचा फटका बसल्याचे अप्रत्यक्ष मान्य केले आहे.
* बारामतीकरांना आता मी सोडून दुसरा आमदार मिळायला हवा.