दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी(ता.7) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची यांची त्यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली. या भेटीनंतर संतोष देशमुख यांच्या भावाने प्रतिक्रिया दिली आहे.त्यात मुख्यमंत्र्यांनी आम्हांला कितीही मोठा गुन्हेगार असला तरी त्याला सोडणार नसल्याचं आश्वासन आम्हांला त्यांनी दिल्याचंही धनंजय देशमुख य़ांनी यावेळी सांगितलं. बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांंच्या हत्येतील तपास, राजकीय आरोप- प्रत्यारोप या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वाची होती. भाजप आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीय यांची भेट झाली. या भेटीनंतर देशमुख कुटुंबियांनी माध्यमांशी संवाद साधला.






संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आम्ही या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या सीडीआरनुसार तपास करण्यात यावा, आम्हांला न्याय हवा आहे, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. आम्हांला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आम्ही केली. आमच्याकडे ज्या काही गोष्टी होत्या, त्या आम्ही मुख्यमंत्र्यांना दाखवल्या. गुन्हेगारांना माफ करणार नाही,असं आश्वासन फडणवीसांनी दिल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
यावेळी धनंजय देशमुख म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जे आश्वासन दिलं होतं. तेच आश्वासन आम्हांला दिलं. या प्रकरणात आम्ही कुणालाही सोडणार नाही. तो कितीही मोठा गुन्हेगार असला तरी त्याला सोडणार नाही, असंही फडणवीस म्हणाले अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.
राज्यात ठिकठिकाणी मोर्चे,आंदोलनं यांनी निषेध नोंदवले जात आहे. अशातच आता दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंबीय थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीसाठी मुंबईकडे निघाले असतानाच त्यांच्या कुटुंबियांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातातून देशमुख कुटुंब थोडक्यात बचावलं होतं.











