आपही काँग्रेसशी जागा वाटपाची चर्चा करण्याचे संकेत, विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी भूमिकेत बदल

0

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसबरोबर जागा वाटपास तयार असल्याचे संकेत आप पक्षाने दिले आहेत. काँग्रेसला कोणतेही सहकार्य करणार नाही, ही आपली आधीची भूमिका आपने बदलली आहे. विरोधी पक्षांची आघाडी होण्यात कोणतेही अडथळे येऊ नयेत म्हणून आपने हा पवित्रा घेतला आहे.

दोन्ही पक्षांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सात लोकसभा जागांपैकी तीन जागा आप सोडण्यास तयार आहे. मात्र, त्याबदल्यात काँग्रेसने पंजाब व आणखी काही राज्यांमध्ये तडजोडीची भूमिका स्वीकारली पाहिजे, अशी आपची मागणी आहे. २०१९ च्या निवडणुकांत पंजाबमध्ये काँग्रेसने आठ जागांवर, तर आपने फक्त एका जागेवर विजय मिळविला होता. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकांत आप दणदणीत विजय मिळवून सत्तेवर आला. त्यामुळे पंजाबमध्ये पूर्वीपेक्षा अधिक जागा लढविण्याचा आपचा विचार आहे. या मुद्यावर काँग्रेसशी चर्चा करून तोडगा काढण्यास अजून काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

अरविंद केजरीवाल यांच्या खरगे संपर्कात
२०२४ च्या लोकसभा निवडणुकांत समविचारी पक्षांची आघाडी व्हावी यासाठी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे प्रयत्नशील आहेत. त्यांनी याआधी सांगितले होते की, आप व काँग्रेस यांची स्वत:ची काही मते आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी किमान समान कार्यक्रमावर एकत्र यावे, असा आमचा प्रयत्न आहे.
विरोधी पक्षांची आघाडी व्हावी म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे देखील विविध नेत्यांशी चर्चा करीत आहेत.