भाजप आमदार सुरेश धस वारंवार आका म्हणून उल्लेख करणारा वाल्मिक कराड हा पुणे सीआयडी कार्यालयात 31 डिसेंबरला सरेंडर झाला. आता चार दिवसानंतर संतोष देशमुख हत्येत ‘वाँटेड’ असलेला सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोघांना बीड पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. त्यामुळे आरोपींचे ‘पुणे कनेक्शन’ चर्चेत आलं आहे.
खासदार सुप्रिया सुळे तसेच मयत संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील या ‘पुणे कनेक्शन’वर सवाल उपस्थित केल्याने ‘संशयकल्लोळ’ वाढला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येत बीड पोलिसांना मोठं यश आलं आहे. वाँटेड मु्ख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून आज पहाटे ताब्यात घेतले. या दोघांना अटक करून केज न्यायालयासमोर हजर केले गेले. या दोघांबरोबर तिसरा आरोपी कृष्णा आंधळे हा पसार आहे. या दोघांबरोबरच तो देखील पुण्यात होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्याच्या मागावर बीड पोलिस आहे.
‘वाँटेड’ घुले अन् सांगळे या दोघांना अटक करण्यापूर्वी संशयित वाल्मिक कराड हा देखील पुणे सीआयडी कार्यालयात 31 डिसेंबरला सरेंडर झाला होता. वाल्मिक कराड हा सरेंडर करण्यापूर्वी काही दिवस पुण्यातच तळ ठोकून होता. वाल्मिक कराड याला पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांची हत्या अन् खंडणीच्या गुन्ह्याचे कनेक्शन असून, आका वाल्मिक कराड हा त्यात सहभागी असल्याचा आरोप केलेला आहे.
वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे हे पुण्यात आढळून आले आहे. पसार कृष्णा अंधाळे देखील पुण्यात होता. त्यामुळे आरोपींचे ‘पुणे कनेक्शन’ चर्चेत असून, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी सवाल उपस्थित केला आहे. या आरोपींचे ‘पुणे कनेक्शन’ नेमकं काय आहे, याचा पोलिस यंत्रणेने शोध घेऊन त्यावर राज्य सरकारने निवेदन करावे, अशी मागणी केली आहे.
खासदार सुळे यांच्यापाठोपाठ मयत संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील आरोपींच्या ‘पुणे कनेक्शन’वर बोट ठेवले आहे. याशिवाय खासदार बजरंग सोनवणे यांनी सर्व आरोपी पुण्यातून सापडत असल्याने पुणे आरोपींचा अड्डा आहे का? असा सवाल केला आहे. त्यामुळे आरोपींचे ‘पुणे कनेक्शन’ चर्चेत आले आहे. पुण्यात हे आरोपी कोणच्या संपर्कात होते? त्यांना कोणाकडून रसद पुरवली गेली? कोणी मदत केली? याची माहिती पुढं आणावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.