अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’नं जगभरात आपल्या वाईल्ड फायर स्टाईलनं आग लावली आहे. सर्व दिग्गजांचे लाईफटाईम कलेक्शनचे रेकॉर्ड्स पुष्पा 2 नं धुळीत मिळवलेत. पण, चित्रपटानं दणक्यात बॉक्स ऑफिसवर एन्ट्री घेऊनही एका घटनेमुळे दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. पुष्पा 2 ची घौडदौड सुरू असतानाच हैदराबादच्या संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी पुष्पा फेम अल्लू अर्जुनला अटक करण्यात आलेली. अशातच आता अल्लू अर्जुनसाठी दिलासादायक बाब म्हणजे, संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला जामीन मंजूर करण्यात आला आहे.






4 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुन संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ च्या प्रीमियरला उपस्थित असताना ही घटना घडलेली. प्रीमियरवेळी थिएटरबाहेर अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. त्यावेळी अल्लू अर्जुन आपल्या कारमधून बाहेर आला आणि त्यानं सर्वांना हात दाखवला. पण, त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या गर्दीत प्रचंड चेंगराचेंगरी झाली. यामध्ये एक महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा लहान मुलगा अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे.
संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. आधी तेलंगणा उच्च न्यायालयानं आता त्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आणि 50,000 रुपयांच्या जामीन जातमुचलक्यावर त्याची सुटका केली होती. अशातच, आता अल्लू अर्जुनला नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे. नामपल्ली कोर्टानं अभिनेत्याला जामीन अटींचा भाग म्हणून प्रत्येकी 50,000 रुपयांचे दोन जामीन भरण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे, अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्या आधारे हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली होती.
मृत महिलेच्या जखमी मुलावर उपचारासाठी 2 कोटींची मदत
24 डिसेंबर रोजी जखमी मुलाचे वडील भास्कर यांनी सांगितलेलं की, 20 दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मुलगा आता हळूहळू प्रतिसाद देऊ लागला आहे. त्यांनी अल्लू अर्जुन आणि तेलंगणा सरकारच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. दुसऱ्या दिवशी, 25 डिसेंबर रोजी, चित्रपट निर्माता आणि अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी जखमी बालक श्री तेज आणि त्याच्या कुटुंबासाठी 2 कोटी रुपयांचा निधी आर्थिक सहाय्य म्हणून देत असल्याचं जाहीर केलं.
अल्लू अर्जुन आता व्हेकेशन मोडवर
पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं (NHRC) पोलीस अधिकाऱ्याला संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलं आणि या प्रकरणावर आवश्यक कारवाईही करण्यात आली. या घटनेमुळे त्रासलेला अल्लू अर्जुन देखील सुट्टीचा प्लॅन करत आहे आणि या प्रकरणाचा निपटारा होताच, तो व्हेकेशनसाठी जाणार असल्याचं बोललं जात आहे.











