अजित पवारांकडे बीड पालकमंत्रीपद? बावनकुळे म्हणाले; हे पूर्वीपासून… यांनाही या नावाची अडचण नाही तेचं होईल

0

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्री पद जाणार, हे तर निश्चित समजलं जात आहे. पण त्यासोबत आणखी एका जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बीडमध्ये झालेल्या संतोष देशमुख खून प्रकरणामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचे आणि वाल्मिक कराडचे जवळचे संबंध असल्याचं दिसून येतंय. मात्र खून प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झालेला आहे.

यामुळे विरोधी पक्षासह सत्तापक्षाचे आमदार धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागत आहेत. धनंजय मुंडे यांनी मात्र ‘माझा काय दोष?’ असं म्हणत राजीनाम्यावर प्रत्युत्तर दिलं. संतोष देशमुख खून प्रकरणातले आरोपी, इतर बंदुकधारी तरुण, खंडणीचं प्रकरण या सगळ्यात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बीडचं पालकमंत्रीपद राहणार नाही, असं दिसून येतंय.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. तसेच प्रकाश सोळंके, सुरेश धस यांनासुद्धा अजित पवारांच्या नावाविषयी अडचण नाही. त्यामुळे तेच बीडचे पालकमंत्री होतील, असं बोललं जातंय. ‘एबीपी माझा’नेही याबाबतचे वृत्त दिले आहे.

अजित पवार हे पुण्यासह बीडचे पालकमंत्री होऊ शकतात. सध्या पवार हे परदेश दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. ते राज्यात परतल्यानंतरच धनंजय मुंडेंचं मंत्रिपद, बीडचं पालकमंत्रीपद यावर खुलेपणाने भाष्य करतील. बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना याबाबत पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले की, बीडचं पालकमंत्रीपद हे पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. आताही त्यांनी त्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच पालकमंत्री पद जाईल. मात्र पालकमंत्री कोण होणार, याबाबत राष्ट्रवादी काँगेस हा पक्ष निर्णय घेईल.