नाराज छगन भुजबळांशी काय चर्चा झाली? CM देवेंद्र फडणवीसांचे प्रथमच थेट भाष्य; सगळेच सांगितले…..

0
1

महायुतीला २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले. यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावेळी चांगलेच मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. तसेच अजित पवार यांच्यावर सडकून टीकाही केली. अशातच छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर परदेशात गेलेले छगन भुजबळ मायदेशात परतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाराज छगन भुजबळ हे सातारा येथे एका कार्यक्रमादरम्यान एकत्र आले होते. तसेच देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच वाहनातून प्रवासही केल्याचे सांगितले गेले. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्याकरिता या मूळ गावी आलो आहे. या ठिकाणी स्मारकाचा एक चांगला प्रकल्प तयार करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले आहे. त्याचे सादरीकरणही पाहिले आहे. लवकरात लवकर या ठिकाणी विस्तारित स्वरुपातील स्मारक व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

छगन भुजबळांशी काय चर्चा झाली?

छगन भुजबळ यांच्यासोबत काय चर्चा झाली, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, छगन भुजबळ यांच्याशी हीच चर्चा झाली की, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य आपल्याला पुढे कसे नेता येईल, ज्या प्रकारे त्यांनी या देशाला दिशा देण्याचे काम केले आहे, ते विचार सर्वांपर्यंत कसे पोहोचवता येतील, समतायुक्त समाज, भारतीय संविधानाला मानणारा समाज आपल्याला कसा निर्माण करता येईल, हीच आमची चर्चा झाली. याव्यतिरिक्त कोणतीही चर्चा नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रि‍पदाचा शब्द दिला आहे का? असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना, देवेंद्र फडणवीस मला मंत्रिपदाबाबात काही बोलले नाहीत. फक्त ७ ते १० दिवस थांबा नंतर चर्चा करु एवढेच ते म्हणाले होते. मला मंत्री करणार किंवा आणखी काही जबाबदारी देणार असे काहीही बोललेले नाहीत. मी देखील तसे काही सांगितले नाही, असे भुजबळांनी स्पष्ट केले.