बावधन व परिसर ४११०७१ नवे पिन नंबर; बावधनमधील नागरिकांकडून पोस्ट ऑफिस उघडण्याची मागणी मान्य

0

बावधन परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी बावधन परिसरात नवे पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले. त्याचे लोकार्पण नुकतेच महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे चीफ पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांच्या हस्ते झाले. त्यामुळे बावधन व परिसरातील नागरिकांसाठी आता नवा पिन क्रमांक तयार झाला आहे. तो पिन ४११०७१ असा असेल.

पुणे शहरातील बावधन परिसराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने बावधन भागातील नागरिकांना पोस्ट ऑफिसच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी दूरवरील पाषाण पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागत होते. त्यामुळे अनेक वर्षांपासून बावधनमधील नागरिकांकडून बावधन परिसरात पोस्ट ऑफिस उघडण्याची मागणी होती. या मागणीचा विचार करून नवे पोस्ट ऑफिस सुरू केले.

अधिक वाचा  पुण्यातील बाहुबली माजी नगरसेवकांचे भाजप पक्षप्रवेश; 22 माजी नगरसेवकांच्या हाती ‘कमळ’ या प्रभागात गणिते बदलली

यावेळी पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये, डायरेक्टर ऑफ पोस्टल सर्व्हिसेस सिमरन कौर, पुणे शहर पश्चिम विभागाच्या प्रवर अधीक्षक रिपन डुलेट, आदी उपस्थित होते. या कार्यालयामध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक, आधार कार्ड, स्पीड पोस्ट, रजिस्टर बुकिंग, पार्सल बुकिंग, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या सर्व सुविधा अशा पोस्टाच्या अनेक सेवांचा समावेश आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे चीफ पोस्ट मास्टर जनरल श्री अमिताभ सिंग यांनी पोस्ट ऑफिसची सेवा केवळ पत्रव्यवहार आणि पार्सल पाठविण्यापुरती मर्यादित नसून, ती जनतेला विविध सुविधांचा लाभ देणारी एक महत्त्वा्ची सेवा आहे असे सांगताना ‘डाक सेवा-जन सेवा’ या ब्रीद वाक्याचा उद्देश नागरिकांच्या जीवनात सोपेपणा आणणे, त्यांना वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा पुरविणे आणि समाजाच्या विकासात सहकार्य करणे असल्याचा उल्लेख केला.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

या गावांना असेल नाव पिन

बावधन पोस्ट ऑफिस उघडल्यामुळे आता बावधन खुर्द, बावधन बुद्रुक, तलाठी ऑफिस परिसर, मराठा मंदिर परिसर, चांदणी चौक परिसर, एन.डी.ए. रस्ता, बावधन पोलिस ठाणे, न्याती, ब्रह्मा व्हॅंटेज, राम नगर, पाटील नगर, देशमुख नगर, विज्ञान नगर, आमची कॉलनी, भुंडे वस्ती, बावधन गाव, पुराणिक अर्बिटंट, स्टारगेज, चेलराम हॉस्पिटल, शिंदे नगर, आदी परिसरांचा नवीन पिन कोड 411071 असा असणार आहे.