राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर साधारण दीड महिना उलटून गेला असला तरी राज्यातील विविध जिल्ह्यातील पालकमंत्री पदाच्या नावांची घोषणा अद्याप व्हायची आहे. नागपूरमध्ये पालकमंत्री कोण होणार याबाबत राज्यभर उत्सुकता असून याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुतोवाच केलंय. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असल्याचे वक्तव्य नितीन गडकरींनी केलं आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा करताना गडकरी यांनी अनावधानानेच पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक रित्या पालकमंत्री पदांची घोषणा करण्याआधीच नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान नागपूरच्या होणाऱ्या पालकमंत्र्यांचे नाव अप्रत्यक्षपणे जाहीर करून टाकल्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
नक्की गडकरी म्हणाले काय?
नागपूर मध्ये खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनावधानाने पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख केला. बावनकुळे यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख झाल्यावर गडकरी यांनी लगेच याबाबत अद्याप घोषणा झाली नसल्याचे ही स्पष्ट केलं पण अप्रत्यक्षरीत्या पालकमंत्री बावनकळेच होणार असल्याचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखा जाहीर करणाऱ्या समारंभात गडकरी बोलत होते. यावेळी भाषणादरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख नागपूरचे पालकमंत्री म्हणून केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. अप्रत्यक्षपणे पालकमंत्री कोण होणार याबाबत नाव जाहीर केल्याने पुढच्याच वाक्यात बावनकुळे अद्याप पालकमंत्री झाले नसले तरी तेच पालकमंत्री होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बावनकुळे यांना काहीही अशक्य नाही. असंही ते म्हणाले.
पालकमंत्रीपदावरून राजकीय चर्चांना उधाण
राज्यात अद्याप अनेक जिल्ह्यांची पालकमंत्रीपदं जाहीर झालेली नसल्याने महायुतीत पालकमंत्रीपदासाठी चढाओढ सुरु असल्याचं बाेललं जात आहे. दरम्यान, महायुतीचे मंत्री पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच, चढाओढ नसल्याचं सांगत आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर आधी मुख्यमंत्री कोण होणार यावरून वेळ लागला नंतर शपथविधीही उशीराच झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मंत्र्यांना खाती वाटप करतानाही बरीच वाट बघावी लागली. आता निकाल लागल्यानंतर साधारण दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटला असून राज्यातील विविध जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नावांची घोषणा झालेली नाही.