कायदा व सुव्यवस्थेसाठी महाराष्ट्राचे कौतुक देशभरात केले जायचे; मात्र अलीकडे राज्यात धार्मिक दंगलीच्या घटना वाढायला लागल्या आहेत. सेंटर स्टडी ऑफ सोसायटी व सेक्युलॅरिझम या संस्थेच्या वार्षिक अहवालानुसार २०२४ या वर्षात देशभरात ५० धार्मिक दंगली झाल्या. यापैकी एकट्या महाराष्ट्रात १२ दंगलींची नोंद करण्यात आली आहे. मॉब लिचिंगमध्येही महाराष्ट्र पुढे असल्याचे हा अहवाल ठळकपणे सांगतो. देशभरात धार्मिक दंगलीच्या घटना वाढल्या आहेत. २०२४ या सरत्या वर्षात देशभरात ५९ दंगलींची नोंद करण्यात आली. त्यामध्ये २०२३ या वर्षाच्या तुलनेत धार्मिक दंगलीत ८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२३मध्ये देशभरात ३२ दंगलींची प्रकरणे समोर आली होती.
धार्मिक दंगलीत या वेळी उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांच्या आधी महाराष्ट्राचा क्रमांक आहे. सेंटर स्टडी ऑफ सोसायटी व सेक्युलॅरिझम या संस्थेच्या वार्षिक अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. या विविध दंगलींत १३ जणांचा जीव गेला.
त्यात १० मुस्लीम तर तीन हिंदूंचा समावेश आहे. २०२४ मध्ये उत्तर प्रदेश व बिहारमध्ये प्रत्येकी सात दंगलींची नोंद करण्यात आल्याचे हा अहवाल सांगतो. देशातील प्रमुख राष्ट्रीय वर्तमानपत्रांचा आधार घेऊन हा वार्षिक अहवाल तयार करण्यात आल्याचे संस्थेने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
मॉब लिचिंगच्या १२ घटना
सरत्या वर्षात देशभरात मॉब लिचिंगच्या १२ घटना समोर आल्या. या घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला. यात हिंदू, ख्रिस्ती समुदायाचा प्रत्येकी एक, तर आठ मुस्लीम नागरिकांचा समावेश आहे. २०२३च्या तुलनेत मॉब लिंचिगच्या घटना कमी झाल्याचे हा अहवाल सांगतो. १२ पैकी ६ मॉब लिंचिगच्या घटना गोहत्या केल्याच्या संशयावरून झाल्या आहेत. मॉब लिचिंगमध्येही महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. राज्यात या वर्षी मॉब लिचिंगच्या तीन, छत्तीसगड, गुजरात, हरियाना व उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन, तर कर्नाटकमध्ये एक घटना घडली आहे.