रणबीर कपूरचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘रॉकस्टार’ मध्ये दिसलेली अभिनेत्री नर्गिस फाखरीशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. नर्गिस फाखरी सध्या तिच्या बहिणीमुळे अचानक लाईमलाईटमध्ये आली आहे. नर्सिगची बहीण आलियावर तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप आहे. 43 वर्षांच्या आलियानं कथितरित्या एका गॅरेजला आग लावली, ज्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर आलिया फाखरीला अटक करण्यात आली.
आलियानं दुमजली गॅरेज पेटवलं?
‘डेली न्यूज’मधील वृत्तानुसार, नर्गिस फाखरीची बहीण आलिया हिनं न्यूयॉर्कमधील क्वीन्समध्ये एका दुमजली गॅरेजला आग लावली. या आगीत तिचा माजी प्रियकर एडवर्ड जेकब्स आणि त्याची गर्लफ्रेंड अनास्तासिया ‘स्टार’ एटीएन यांचा मृत्यू झाला आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी आलिया फाखरीला अटक केली आहे. सध्या आलिया पोलिसांच्या ताब्यात असून तिला क्रिमिनल कोर्टातून जामीन मिळालेला नाही.
वकिलांनी काय सांगितलं?
अमेरिकेतील वकील डिस्ट्रिक्ट अटॉर्नी मेलिंडा कॅट्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आलियानं चुकीच्या पद्धतीनं आग लावून दोन लोकांचा जीव घेतला आहे. यामध्ये आलियाचा एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा समावेश आहे. दोघांचाही आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, नर्गिस फाखरीच्या आईनं समाचार आऊटलेटला यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी माझी मुलगी असं काहीच करू शकत नाही, असं सांगितलं.
नर्गिसच्या आईचा आलियाबद्दल खुलासा
नर्गिस फाखरीच्या आईनं आलियावर लावण्यात आलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. त्या म्हणाल्या की, मला वाटत नाही की, ती कुणाचीही हत्या करेल. ती सर्वांची काळजी घेणारी व्यक्ती होती. तिनं नेहमीच सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी एका साक्षीदारानं सांगितलं की, “आम्हाला काहीतरी जळाल्याचा वास आला. मला माहीत नाही की, ते पेट्रोल होतं की, आणखी काही… बाहरे पळत गेलो तर, पायऱ्यांवर ठेवलेल्या सोफ्याला आग लागल्याचं पाहायला मिळालं. आतमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी आम्हाला त्या सोफ्यावर उडी मारावी लागली. स्टारनं माझ्यासोबत उडी घेतली, पण त्यानंतर जेकब्सला वाचवण्यासाठी तो पुन्हा आत गेला. आलिया आधी सर्वांना सांगायची की, ती त्याचं घर जाळून टाकेल, त्याला मारेल. त्यावर आम्ही फक्त हसायचो… पण खरंच असं काही करेल याचा विचार आम्ही केला नव्हता.
आलियाच्या एक्स बॉयफ्रेंडच्या आईनं काय सांगितलं?
एडवर्डच्या आईनं एका निवेदनात म्हटलं आहे की, एडवर्ड आणि आलिया एक वर्षानंतर वेगळे झाले होते, तरीही आलिया एडवर्डचा पाठलाग करत होती. एडवर्डच्या आईनं असंही सांगितलं की, एडवर्ड आणि अनास्तासिया हे पार्टनर नसून फक्त मित्र होते. या प्रकरणी अभिनेत्री नर्गिस फाखरीकडून अद्याप कोणतेही वक्तव्य किंवा स्पष्टीकरण आलेलं नाही.