राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले….

0

विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) निराशाजनक कामगिरीनंतर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणाऱ्या अविनाश जाधव यांना राज ठाकरे यांनी पुन्हा कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. अविनाश जाधव यांनी मनसेच्या (MNS) पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी याबाबतचे पत्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पाठवले होते. मात्र, यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये अविनाश जाधव यांनी आपण राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. राज ठाकरे यांच्या आदेशाने मी पुन्हा जिल्ह्याध्यपदाचा कार्यभार स्वीकारत असल्याचे अविनाश जाधव यांनी म्हटले होते.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

अविनाश जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. मी तुझा राजीनामा अमान्य केला आहे, ठाणे आणि पालघरची जबाबदारी मी तुला दिली आहे, पुन्हा स्वीकार आणि कामाला लाग, असे राज ठाकरे यांनी जाधव यांना सांगितले. त्यामुळे आता अविनाश जाधव यांनी पदभार स्वीकारुन पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने जवळपास 128 जागांवर उभे केले होते. मात्र, एकाही जागेवर मनसेचा उमेदवार विजयी झाला नव्हता. ठाणे जिल्ह्यात अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे 12 उमेदवार पराभूत झाले होते. ठाणे विधानसभा मतदारसंघात अविनाश जाधव हे भाजपच्या संजय केळकर यांना कडवी टक्कर देतील, अशी चर्चा होती. मात्र, संजय केळकर यांनी ठाण्यातून पुन्हा एकदा सहजपणे विजय प्राप्त केला. दरम्यान, विधानसभेतील पराभवानंतर मनसेचे पालघर विक्रमगढ तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी अविनाश जाधव यांच्यावर गंभीर आरोप केला होता. निवडणूक काळात जाधव यांनी पालघरमधील उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना सहकार्य केले नाही, अशी तक्रार योगेश पाटील यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली होती. पक्षातील या अंतर्गत कुरबुरींमुळे अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता जाधव यांनी राजीनामा मागे घेतला. यावरुन आता आरोप होत आहेत. अविनाश जाधव यांनीच हे औटघटकेचे राजीनामानाट्य घडवल्याचा आरोपही केला जात आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

अविनाश जाधव राजीनामा देताना काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीत ठाणे व पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे, असे अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.