पुण्यातील कोरेगाव भीमा येथे आज 207 वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायींनी गर्दी केली आहे. त्यासोबतच या ऐतिहासिक विजय स्तंभाला आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे. पुण्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी शौर्य दिनानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. कोरेगाव भीमा या ठिकाणी 5 हजार पोलीस सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले आहेत.






कोरेगाव भीमा येथे 207 व्या शौर्यदिनी ऐतिहासिक विजयस्तंभ शौर्यदिन कार्यक्रमानिमित्त प्रशासनाकडून नियोजनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावर्षी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या धर्तीवर ऐतिहासिक विजयस्तंभास फुलांची सजावट करण्यात आली आहे. त्यासाठी ७० हजार कृत्रिम आणि १ हजार किलो खऱ्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास शौर्यदिनी होणाऱ्या मानवंदना कार्यक्रमादरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात येते. तब्बल वीस गुंठे जागेमध्ये असलेला ७५ फुटी ऐतिहासिक विजयीस्तंभ यावर्षी कृत्रिम व खऱ्या फुलांनी सजविण्यात आला आहे. या स्तंभावर फुलांनी अशोकचक्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि संविधानाचे तैलचित्र लक्ष वेधून घेत आहे .
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
कोरेगाव भीमा या ठिकाणी पाच हजार पोलीस कर्मचारी, सातशे पन्नास पोलिस आधिकारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच एक हजार होमगार्ड आणि आठ कंपन्या काम करत आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 50 पोलिस टॉवर, 10 ड्रोन आणि चोरी रोखण्यासाठी विशेष पोलिस पथक आहे, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. यावेळी शांतता राखण्यासाठी 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची दंगल होऊ नये यासाठी सोशल मीडियावरही निर्बंध घालण्यात आले आहे. काही आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी जाहीर केले आहे.
प्रकाश आंबेडकरांनी केले अभिवादन
कोरेगाव भीमा येथे 207 व्या शौर्यदिनी ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “दरवर्षीप्रमाणे यंदाही मी एक जानेवारी रोजी अभिवादनासाठी आलो आहे. सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. अभिवादन करण्यासाठी आजही जनता येत असते ही गोष्ट चांगली आहे. सरकार आपल्या पद्धतीने सुविधा पुरवत असते, पण या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. यापुढच्या वेळेस इतर सुविधा पुरवल्या जातील” अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली.
“समाजतील विषमता अणि अमानुष वागणूक यामधील हा लढा फिजिकल संपला आहे मात्र मानसिकरित्या सुरू आहे असं मी मानतो. तो जो पर्यंत सुरू राहील. लोकं अभिवादन करण्यासाठी येत राहतील. ही चळवळ सुरू राहिली पाहिजे. परभणी आणि बीडची घटना घडली, मानसिक बदल झाला नाही. अनेक घटना घडत आहेत. मानवतावादी लढा ज्यांनी उभा केला त्यांनी परत पुढं यावं म्हणजे हा संघ संपेल”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“केंद्र आणि राज्य सरकार हे भाजपच आहे. हे पॉलिटिकल पार्टी आहे. टोकाचे मतभेद आहेत. सगळ्यांनी समोर येऊन प्रयत्न केले पाहिजे. बीड प्रकरणी लढ्याला वेगळा रंग दिला जात आहे . पोलिस खात्याला कराड कुठं होता, हे महिती नव्हतं, हे मला आश्चर्य वाटत आहे. कराड प्रकरणी सरकारवर प्रेशर आहे हे मात्र नक्की, त्याला मुख्यमंत्र्यानी बळी पडू नये हे पोलीस खात्याचं अपयश होत असं मी मानतो”, असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले.
माधुरी मिसाळ यांनी केले कोरेगाव भीमा विजयस्तंभास अभिवादन
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही कोरेगाव भीमा विजयस्तंभास अभिवादन केले. यावेळी त्यांनी भावना व्यक्त केल्या. बाबासाहेब आंबेडकर इथे येऊन गेले आहेत. आज २०७ वा हा शौर्य दिवस साजरा होतो आहे. सरकार म्हणून लोकांची सगळया सोयी केल्या आहेत. या ठिकाणी येणाऱ्या लोकांची योग्य सोय व्हावी, यासाठी सर्व प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. पोलीस देखील चोख बंदोबस्त बजावत आहेत. सामाजिक न्याय विभागाकडून सर्व सुविधा पुरवण्यात येत आहेत. बाबासाहेबांचं योगदान मोठे आहे. सगळ्यांना आवाहन आहे की सर्वांनी मानवंदना शांततेत द्यावी. बाबासाहेबांनी जातीवाद पसरु नये, म्हणून खूप प्रयत्न केले. त्यांच्या संविधानावर देश चालतो. जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये.











