मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिवसेनेनंतर आता भाजपमध्ये नाराजीनाट्य, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे राजीनामे

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी झाला.या विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे एकूण ३९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु यानंतर नाराजीनाट्य समोर येऊ लागले आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांत नाराजी नाट्य सुरु झाले आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकर यांनी उपनेतेपदाचा राजीनामा रविवारी दिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ नाराज झाले आहेत. तसेच भाजपमधील नाराजी समोर आली आहे. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहे. तसेच महायुतीमधील घटकपक्ष असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते (आठवले गट) आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंत्रिमंडळात पक्षाला स्थान न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांना मंत्रिपद न दिल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहे. पूर्व नागपूरातील भाजपच्या मंडळ अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे आपले राजीनामे पाठवले आहे. भाजप शहर अध्यक्ष तिजेंद्र कुकडे यांच्याकडे त्यांनी राजीनामे दिले आहे. पुढील भुमिका ठरवण्यासाठी आज पूर्व नागपूरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी बैठक बोलवली आहे. विधानसभा निवडणुकीत पूर्व नागपुरातून आमदार कृष्णा खोपडे यांनी दीड लाखापेक्षा जास्त मतांनी चौथ्यांदा विजय मिळवला. त्यांना मंत्रीपद मिळेल अशी आशा होती, पण मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांची निराशा झाली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन कार्यकर्ते नाराजी व्यक्त करणार आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे समर्थक व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

राणा दाम्पत्य नाराजी
आमदार रवी राणा यांना मंत्रिमंडळात संधी न दिल्याने राणा दांपत्य प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रवी राणा हे नागपूर मधील विधिमंडळ अधिवेशनात सहभागी होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. रवी राणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आहे. परंतु मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ते नाराज झाले आहे. रवी राणा रविवारीच नागपूरवरून अमरावतीला परतले. विधानसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणांनी संपूर्ण अमरावती जिल्हा भाजपसाठी पिंजून काढला होता. मात्र मंत्रिमंडळात रवी राणांना स्थान न दिल्याने नवनीत राणा ही नाराज असल्याची माहिती मिळाली आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

शिवसेना उपनेते भोंडकर म्हणाले…
शिवसेना नेते आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले, भंडारा जिल्ह्याला न्याय मिळावा ही माझी सुरुवातीपासून अपेक्षा होती. ती पूर्ण झाली नाही. म्हणून मी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. भंडारा जिल्ह्यावर अन्याय झाला आहे, अशी भावना सगळ्या कार्यकर्त्यांची आहे.उपनेता व पूर्व समन्वयक पद असून न्याय मिळत नसेल तर मला वाटते पद नसलेले बरे. विना पदाने जर मंत्रिपद मिळत असेल तर त्या पदाचे काय करायचे? यामुळे मी उपनेतेपदाचा राजीनामा दिला, असे भोंडेकर यांनी म्हटले.

मला नाही मिळाला तरी चालेल. परंतु भंडारा जिल्ह्यातून दुसऱ्या मित्र पक्षाला का होईना स्थान मिळायला हवे होते. भंडाऱ्यात स्थानिक पालकमंत्री हवा होता. मी मंत्रिमंडळ विस्तारात गेलो नाही पण सर्वांना शुभेच्छा आहेत. मागच्या अडीच वर्षातही माझा क्लेम होता. परंतु त्यावेळी संधी दिली नाही. पक्षात मी पद घेणार नाही. मी साधा शिवसैनिक राहील, असे आमदार भोंडेकर यांनी म्हटले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार