महायुती 2.0 शपथविधी झाला पण…. पुणे जिल्ह्यात ‘यांचा’ अपेक्षाभंग महायुतीलाच आगामी काळात धोकादायक?

0
2

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून दत्तात्रेय भरणे यांना राज्यमंत्री पदावरून कॅबिनेट मंत्री पदावर बढती करण्यात आली. मात्र, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, तिसऱ्यांदा निवडून आलेले राहुल कुल आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांचा पहिल्या यादीत समावेश न झाल्याने अपेक्षाभंग झाला आहे.तर, सलग आठव्यांदा विजय मिळविलेल्या माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश असणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्रिपदावर अजित पवार विराजमान झाले. त्यांच्यानंतर जिल्ह्यात कोणाला मंत्रिपदे मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. पुणे जिल्ह्यातील १० जागांपैकी आठ जागा महायुतीला, एक जागा अपक्षाला तर एक जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाली.

आरोग्याच्या कारणास्तव मंत्रिपद स्वीकारणार नसल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे जिल्ह्यात मंत्रिपदावर वर्णी लागण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त होती.

शिवतारेंच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी 

जिल्ह्यात शिवसेनेकडून पुरंदर विधानसभा मतदारसंघातून विजय शिवतारे विजयी झाले. यापूर्वी २०१४ मध्ये याच मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर त्यांना राज्यमंत्रिपद मिळाले होते. त्यामुळे यंदाही त्यांना संधी मिळेल, अशी कार्यकर्त्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, मंत्रिपदाच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव न आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

शिवसेनेला एकही मंत्रिपद नाही

जुन्नर विधानसभा मतदार संघात २०१४ मध्ये शरद सोनवणे यांच्या रूपाने जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार निवडून आले होते. मात्र, २०१९च्या विधानसभेत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

याच मतदार संघातील पंचरंगी लढतीमध्ये आता ते अपक्ष निवडून आले. विजयी झाल्यानंतर मंत्रिपदाच्या अपेक्षेने त्यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे त्यांचा विचार होईल, असे सांगितले जात होते. मात्र, त्यांच्याही पदरी निराशा आली आहे. शिवतारे आणि सोनवणे यांच्या रूपाने जिल्ह्यात शिवसेनेला दोन जागा मिळूनही एकही मंत्रिपद मिळाले नाही.

कुल यांना तिसऱ्यांदा हुलकावणी

दौंड विधानसभा मतदार संघातून राहुल कुल हे तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. कुल यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात भाजपला एकमेव जागा मिळाली आहे. प्रत्येक निवडणुकीत मंत्रिपद देण्याचे आश्‍वासन पक्षाकडून त्यांना देण्यात येत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यामुळे यंदा त्यांचे मंत्रिपद निश्‍चित मानले जात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्ती म्हणून ओळखले जातात; परंतु तिसऱ्यांदा त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

भरणे यांना दुसऱ्यांदा संधी

इंदापूर मतदार संघातून तिसऱ्यांदा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विजयी झालेल्या दत्तात्रेय भरणे यांना दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या भरणे यांना यापूर्वी २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. यंदा मात्र पक्षाने त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

शेळके यांना हुलकावणी

राज्यात सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी झालेल्या पाच आमदारांमध्ये मावळ विधानसभा मतदार संघातील आमदार सुनील शेळके यांचा समावेश आहे. यंदा त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र त्यांचीही संधी हुकल्याचे स्पष्ट झाले आहे.

तापकीरांना मंत्रिपदाची हुलकावणी

पुणे महापालिकेत नगरसेवकपदी म्हणून भीमराव तापकीर २००२ आणि २००७ मध्ये निवडून आले होते. त्यानंतर ते २०११, २०१४, २०१९ आणि २०२४ असे सलग चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. तापकीर २०११ मध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आली होती. यावेळी त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. परंतु या वेळीही त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

राज्यात दोन, केंद्रात एक मंत्रिपद

भाजपच्या पहिल्या फळीतील नेते म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे यंदाही त्यांचा समावेश मंत्रिमंडळात होणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते छातीठोकपणे सांगत होते. २०१९ च्या निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर महसूलसह सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार त्यांनी पाहिला होता.

त्यामुळे यंदा त्यांना संधी मिळणार असल्याचे पक्के मानले जात असले, तरी खाते कोणते मिळणार, हाच चर्चेचा विषय होता. पाटील आणि मिसाळ यांच्या रूपाने राज्यात दोन मंत्रिपदे, तर मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने केंद्रात राज्यमंत्रिपद असल्याने शहराचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.