बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. आरोपींना ताब्यात घेऊन शिक्षा देण्यात यावी यासाठी रस्ता रोकोही करण्यात आला होता. या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी जरांगेंनी केली होती. त्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले होते. दरम्यान, आता या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे.
सरपंच देशमुख यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करा; आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी
बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मृत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद जिल्हाभरात पाहायला मिळाले. ही घटना घडल्यानंतर आज आमदार प्रकाश सोळंके यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. काही राक्षसी प्रवृत्तीचे लोक जिल्ह्यात दहशत निर्माण करत आहेत. आणि सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात स्थानिक पोलिसांना तपास न देता यात एसआयटी स्थापन करा अशी मागणी सोळंके यांनी केली आहे.
मस्साजोग येथील सरपंचाचा खून आणि परळीतील तरूण व्यापाऱ्याचे झालेले अपहरण हा प्रकार अतिशय गंभीर असून या दोन्ही घटनांचा तपास विशेष तपास यंत्रणेद्वारे व्हावा अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. जिल्हयात घडणाऱ्या अशा घटनां विषयी आ. पंकजाताईंनी चिंता व्यक्त केली असून याविषयी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी आपण स्वतः चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अलिकडच्या काळात घडलेल्या घटना चिंताजनक आहेत : पंकजा मुंडे
मस्साजोग ता. केज येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली. त्याचप्रमाणे परळी येथील तरूण व्यापारी अमोल डुबे यांचं काल रात्री काही लोकांनी अपहरण करून लूटमार केली याबाबत माहिती प्राप्त झाली . या दोन्ही घटनांबरोबरच जिल्हयात अलिकडच्या काळात घडलेल्या घटना चिंताजनक आहेत पोलिसांनी या दोन्ही घटनांची स्पेशल इन्व्हिस्टीगेशन टीमद्वारे सखोल चौकशी करावी अशी मागणी करून आ. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हयात अशा घटना घडत आहेत याबद्दल संताप व्यक्त केला आहे . याबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
आरोपींना तात्काळ अटक करावी, बजरंग सोनवणे यांची मागणी
संतोष देशमुख हे मस्साजोग येथील महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती आहेत. दुपारी अज्ञात काही व्यक्तींनी त्यांचं अपहरण केले होते. संतोष देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीचे जखमा आहेत. त्यामुळे त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त होतोय. दरम्यान ग्रामस्थांनी केज पोलीस ठाण्यात गर्दी केली असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. सध्या मस्साजोग परिसरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.