सोमवारी सकाळी सकाळी पुणे हादरलं. भाजपचे विधान परिषदचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं सोमवारी पहाटे अपहरण झालं. पुण्यातील मांजरी परिसरात राहणारे योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश सातबा वाघ मॉर्निग वॉकला गेले होते. त्यावेळी त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवलं अन् अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होते. अशातच आता सतिश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे आता संपूर्ण पुण्यात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
12 तासात नेमकं काय घडलं?
पुण्यातील मांजरी रोडवर पहाटे साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. सतिश वाघ मॉर्निग वॉकला जात असताना एक चारचाकी गाडी सतिश वाघ यांच्याजवळ आली अन् अपहरणकर्त्यांनी वाघ यांना जबरदस्तीने गाडीत बसवलं. अपहरण झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. पुण्याच्या पोलिस आयुक्तांना याची माहिती मिळाली तेव्हा अमितेश कुमार यांनी हडपसर पोलिस स्टेशन गाठलं अन् प्रकरणाची माहिती घेतली.
पोलिसांच्या पाच तुकड्या तयार करण्यात आल्या. पोलिसांनी कसून चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासलं अन् आसपासच्या लोकांची चौकशी केली. घरगुती वाद, प्रोपर्टी वाद अशा अनेक अँगलने पोलिसांनी तपास केला. मात्र, एकही हिंट पोलिसांना मिळत नव्हती. पोलिसांना हाती काहीही लागत नव्हतं. अमितेश कुमार यांनी स्वत: तपास केंद्रावर मार्गदर्शन केलं पण दिवस अखेर पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाही. अखेर पुण्यापासून 34 किलोमीटर लांब असलेल्या यवत गावात त्यांचा मृतदेह आढळून आला.
सोलापूर हायवेवरून यवत मार्गे ही गाडी गेली असावी, असा पोलिसांना संशय आहे. मांजरी ते यवत या प्रवासातच सतीश वाघ यांचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आता पुण्यात खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.
कोण होते सतीश वाघ?
सतीश वाघ हे शेतकरी होते. आमदार योगेश टिळेकर यांचे ते सख्खे मामा होते. सतीश वाघ यांच्या नावावर मांजरीमध्ये दोन एकर जमीन देखील आहे. अशातच वाघ यांचं अपहरण करताना एका व्हिडीओ समोर आला. वाघ यांच्या मुलाने अपहरणाची तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, 12 तासाच्या तपासानंतर देखील पोलिसांच्या हाती काही लागलं नाही अन् सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे.