महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आता देवेंद्र फडणवीसच असतील याविषयी केवळ अधिकृत घोषणा होण बाकी आहे. भाजपच्या केंद्रीय कोर कमिटीने देवेंद्र फडणवीस यांचे नाव विधिमंडळ गटनेता म्हणून निश्चित केलं आहे. यामुळे राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच शपथ घेतील.
निर्मला सीतारामन यांच्या उपस्थिती बैठक झाली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांची निवड करण्यात आली. असं जरी असलं तरी भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे पुढील पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काही महत्त्वाची आव्हानं असणार आहेत.
निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली. या लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्राच्या तिजोरीवर मोठा ताण पडला किंवा तिजोरी रिकामी झाली असे म्हटले गेले.आता हीच तिजोरी भक्कम करण्याचे आव्हान मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे असणार आहे.महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करून जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी या महाराष्ट्रामध्ये निर्माण करणे हे महत्त्वाचं काम मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांसमोर असणार आहे.
गेल्या पंचवार्षिक मध्ये महाराष्ट्रावर कोरोनाचं मोठं संकट आलं. यानंतर काही प्रमाणावर आरोग्य यंत्रणा ही महाराष्ट्रात सुधारली असं म्हटलं जातंय. मात्र कोरोनाशी सामना करताना यंत्रणा कमकुवत होती हेच दिसून आलं. अशावेळी कोणत्याही आरोग्य विषयी संकटाशी महाराष्ट्र मुकाबला करू शकेल यासाठी महाराष्ट्र आरोग्य क्षेत्रात कशाप्रकारे मजबूत होईल, कशाप्रकारे त्यामध्ये सुधारणा करता येतील याविषयी फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करावं लागणार आहे.
महाराष्ट्रावर गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर आसमानी संकट आल्याचं पाहायला मिळत आहे. बदललेला हवामानामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा कशाप्रकारे फडणवीस निपटारा करतात हे पाहणं अतिशय उत्सुकतेच असणारे. कारण अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहेच, त्यातच शेतकऱ्यांच्या पिकाला मिळत नसलेला भाव यामुळे देखील शेतकरी संतप्त आहे. अशावेळी या प्रश्नाचे उत्तर कशाप्रकारे फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काढतात हे पाहणं अतिशय उत्सुकतेच असणार आहे.
महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर उद्योग हे गुजरातला जातात. अशा प्रकारचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. अशावेळी महाराष्ट्रामध्ये शिक्षित बेरोजगाराची संख्या मोठी आहे. या शिक्षित बेरोजगाराला कशाप्रकारे रोजगार देता येईल याकडे आता फडणवीस यांनी लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. आणि शिक्षित बेरोजगारांचा प्रश्न कशाप्रकारे फडणवीस येत्या पाच वर्षात हाताळतात हे पाहणं अतिशय उत्सुकतेच असणार आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय तणाव पाहायला मिळाला. मराठा समाज ओबीसी समाज एकमेकांविरुद्ध उभा ठाकला असल्याचे देखील पाहायला मिळाले. अशावेळी हा सामाजिक द्वेष कशाप्रकारे फडणवीस दूर करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचा असणार आहे. फडणवीसांसाठी महाराष्ट्रातील जातीय द्वेष कमी करणे किंबहुना तो संपवणं हे एक महत्त्वाचं आव्हान असणार आहे.