राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस गुरुवारी शपथ घेणार आहेत. त्यासाठी भाजपने आझाद मैदानात ग्रँड नियोजन केलंय. त्यापूर्वी आज (बुधवारी) देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ गटनेता म्हणून निवड झाली. भाजपचे केंद्रीय पक्ष निरीक्षक विजय रुपानी आणि निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत सुरुवातीला कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीसांच्या नावाचा ठराव मांडला. त्याला पंकजा मुंडेंसह इतर भाजप नेत्यांनी समर्थन दिलं.
निवडीनंतरच्या भाषणात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभेनंतर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये विजयाची मालिका सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो, एवढं बहुमत जनतेने दिलं आहे. एक हैं तो सेफ है.. मोदी हैं तो मुमकीन है; हे आता जनतेने सिद्ध करुन दिलं आहे.
फडणवीस पुढे म्हणाले, आपल्यासोबत असेलले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदास आठवले आणि मित्रपक्षांचे आभार मानतो. ज्या संविधानाने ही प्रक्रिया दिली. ते संविधान कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा मोठं आहे, असं मोदीजी म्हणतात. त्यानुसारच आपल्याला राज्याचा कारभार पुढे न्यायचा आहे.
”जनदेशाचा आनंद आहेच. पण जबाबादारीदेखील वाढली आहे. जबाबदारीची जाणीव करुन देणारा, हा जनादेश आहे. लोकांचा सन्मान राखण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आपण सुरु केलेल्या योजना आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करणं, ही प्राथमिकता आहे.”
‘त्या’ अडीच वर्षात त्रास झाला
फडणवीस पुढे म्हणाले की, सर्व आघाड्यांवर महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. २०१९ साली जनतेने आपल्याला कौल दिला होता. परंतु दुर्दैवाने तो कौल हिसकावून घेण्यात आला. तेव्हा जनतेसोबत बेईमानी झाली. सुरुवातीच्या अडीच वर्षात ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्रास देण्यात आला, आमदारांना त्रास देण्यात आला.. अशाही परिस्थितीत एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही. सगळे आमदार आणि नेते संघर्ष करीत होते. त्यामुळे २०२२ साली आपलं सरकार स्थापन झालं. आपल्या महायुतीला प्रचंड बहुमत त्यामुळे मिळालं.
”माझ्यासारख्या बूथ कार्यकर्त्याला मोदीजींनी तीनवेळी संधी दिली. एकदा ७२ तासांसाठीच होतो. परंतु टेक्निकली होतो. त्यामुळे तीनवेळी मला संधी दिली त्यांचे मी आभार मानतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांचेही आभार मानतो.” अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली.