महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. त्यानंतर महायुतीत सत्ता वाटपाचा तिढा सुरू झाल्याचे चित्र दिसून आले. राज्यातील निकालानंतर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यापूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती. या बैठकीची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. या बैठकीत अमित शाह यांच्या एका प्रश्नावर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निरुत्तर झाले.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी चांगलेच आग्रही होती. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी शिंदे यांनीच मुख्यमंत्री व्हावे अशी भूमिका सातत्याने मांडली होती. राज्याची विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या चेहऱ्यावर लढवण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी असे शिवसेना नेत्यांचे मत होते.
अमित शाह यांच्याकडे केली मागणी…
गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती. टाईम्स ऑफ इंडियाने भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती. सरकारच्या पूर्णकाळासाठी हे मुख्यमंत्रीपद देणे शक्य नसेल तर शिंदे यांनी त्याला पर्याय दिला. सरकारच्या कार्यकाळातील सुरुवातीचे किमान 6 महिने तरी मुख्यमंत्रीपद द्यावे अशी मागणी केली. त्यावर अमित शाह यांनी नकार देत मागणी फेटाळून लावली.
अन् शाहांच्या एका प्रश्नाने शिंदेची तलवार म्यान…
एकनाथ शिंदे यांची मागणी अमित शाह यांना फेटाळून लावली. फक्त 6 महिन्यांसाठी मुख्यमंत्रीपद देणे हे चुकीचे उदाहरण ठरू शकेल आणि 6 महिन्यासाठी मुख्यमंत्रीपद देणे, अशी कोणतीही पद्धत नसल्याचे त्यांनी म्हटले. शाह यांनी म्हटले की, जर समजा, तुमच्याकडे बहुमत असते, अधिक जागा असत्या तर तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडले असते का, असा सवाल एकनाथ शिंदे यांना केला. त्यावर शिंदे हे निरुत्तर झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शाह यांच्या या भूमिकेनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठीची मागणी सोडली आणि इतर खात्यांची मागणी करण्यावर भर देण्यास सुरुवात केली.