महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं आहे. तर या निवडणुकीत महाविकास आघाडीने सपाटून मार खाल्ला. मात्र, पराभूत झालेल्या महाविकास आघाडीसह मनसे आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आपल्या पराभवाचं खापर ‘ईव्हीएम’वर फोडलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर निवडणुकीच्या निकालाविरोधात कोर्टात जाण्याची भूमिका घेतली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी EVM विरोधात मोठं जनआंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. शिवाय ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी देखील ईव्हीएम विरोधात पुण्यातील भिडे वाड्यात आत्मक्लेष आंदोलन सुरू केलं होतं.
या आंदोलनाला शरद पवार यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भेट दिली. दरम्यान, आता विविध राजकीय पक्षाकडून ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र विरोधकांचे हे सारे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी फेटाळून लावले आहेत.
एस. चोक्कलिंगम म्हणाले, “EVM हॅक होऊ शकत नाही. कारण ते वायफायला किंवा ब्लूटूथला कनेक्ट करता येत नाही.” तसंच कोणतेही अतिरिक्त मतदान झालेलं नाही. परळीत काही लोकांनी गोंधळ घातला यावळी पोलिसांनीही गोंधळ घालणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.s
दरम्यान, शरद पवार यांनी देखील ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. ते काल माध्यमांशी बोलताना म्हणाले, “शेवटच्या दोन तासांत 7 टक्क्याच्या वर मतदान झालं हे अत्यंत धक्कायक आहे. माझा मतं सेट करण्यावर आधी विश्वास बसत नव्हता पण आता त्यात तथ्य आहे असं त्यात वाटतयं.”