महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असताना काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बिटकॉइन घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांच्याकडून करण्यात आला. हे प्रकार मोठ्या प्रमाणातते पुन्हा घडू नयेत
त्यानंतर भाजप नेत्यांनीही पत्रकार परिषद घेत सुप्रिया सुळे आणि पटोले यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळल्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली भूमिका मांडली आहे. “आरोप करणारी व्यक्ती अनेक महिने तुरुंगात होती, त्या व्यक्तीच्या म्हणण्याची नोंद तरी कशाला घ्यायची. माझ्या मते त्या व्यक्तीच्या बोलण्याची नोंदही घेण्याची आवश्यकता नाही,” असं मत पवार यांनी व्यक्त केली आहे.
शरद पवार पुढे म्हणाले की, “राज्यातील प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीत झाली. त्या निवडणुकीवेळी महाराष्ट्रात ६७ टक्के मतदान झालं होतं. मात्र नॉर्थ इस्टमधील छोट्या-छोट्या राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी ही ७०-७५ पेक्षाही जास्त होती. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होणं महाराष्ट्रासारख्या राज्याला शोभनीय नाही. कोणत्याही परिस्थितीत मतदान करा. तुम्हाला जी व्यक्ती किंवा जो राजकीय पक्ष योग्य वाटत असेल त्याला मत द्या, पण मतदान नक्की करा,” असं आवाहन पवार यांनी केलं आहे.
दरम्यान, “साधारण महाराष्ट्रात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असते. मात्र नागपूर जिल्ह्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. तो प्रकार अस्वस्थ करणारा होता. यावेळी असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले. ते पुन्हा घडू नयेत,” अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.