मीही निवृत्त होणार पण..; शरद पवारांचे नाव घेऊन अजित पवारांनी दिले संकेत, वारसदाराबद्दल काय म्हणाले? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी गेल्याच आठवड्यात एका भाषणातून राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. बारामती मतदारसंघातील प्रचारसभेत बोलताना आता खासदारकीचे दीड वर्षे उरले आहेत, पुढे पुन्हा सभागृहात जायचं की नाही ते ठरवू, असे शरद पवार यांनी म्हटले होते. शरद पवारांच्या या भाषणाचा संदर्भ देत आता अजित पवारांनीही राजकीय निवृत्तीबाबत वक्तव्य केलंय…..






बारामतीत 1967 पासून जेवढा निधी आणला नव्हता, तेव्हढा मी मागच्या पाच वर्षात आणला आहे. नदीला पाणी कुणी सोडलं ते डोक्यात आणा, कॅनॉल सोडला नसता तर काय अवस्था झाली असती. एकदा त्या पदावर गेल्यावर धमक असली पाहिजे. अधिकाऱ्याला फोन गेल्यावर तो अधिकार खुर्चीवरून उठला पाहिजे. सर.. सर.. केलं पाहिजे. पुढची लोक म्हणत आहेत अजित पवार निवडून आणले तर तो लायनिंग करेल. तुमचं पाणी जाईल.. मी काय येडा आहे का? मला कळत नाही का?, असे म्हणत अजित पवारांनी यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा निवडून देण्याचं आवाहन बारामतीकरांना केलं आहे. बारामतीत सुरक्षितता आहे, बारामतीत दहशत नाही असेही अजित पवार यांनी म्हटले. विशेष म्हणजे शरद पवारांनंतर आता अजित पवारांनीही राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
वाढपी घरचा असल्यावर जास्त वाढणार ना? चार जण जेवायला बसलो तर आई लाडक्या लेकाला वाढते ना? नळी, नळ्या वाढते ना.. असे अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. साहेब म्हणाले की, दीड वर्षानंतर मी थांबणार आहे. साहेबांना मी थांबा म्हटलं नाही.. नाहीतर माझ्या नावावर पावत्या फाडतील. जर साहेब नसतील तर कोण बघणार आहे तालुका?. एक कार्यकर्ता दोन वेळा अजितदादा मोठ्याने म्हणाला. त्यावर अजित पवार म्हणाले शहाण्या, अकरा वाजता चंद्रावरती गेलाय. दिवस तरी मावळू देत, असा मिश्कील टोला लगावला. साहेब कधी थांबले?, मी साहेबांचे एकायचे ठरवलं आहे. साहेब 85 ला थांबतील. तेव्हा मी ही थांबेल, अजून 20 वर्ष आहेत.. जोपर्यंत मी चांगला आहे तोपर्यंत मी काम करीत राहील.. जेव्हा होत नाही त्यावेळी बसून ठरवू, कुणाच्या हातात द्यायचं ते, असे म्हणत अजित पवारांनीही राजकीय निवृत्तीबाबत वक्तव्य केले.
कालव्याच्या पाण्याबाबत
निरा उजवा आणि नीरा डावा कालव्याचे पाणीवाटप कसं झालं असं सांगा म्हटल्यावर, अजित पवार म्हणाले मी आता सांगत बसत नाही. मला दोन्ही कडची मते पाहिजेत, पण योग्य झालं असेल एवढंच सांगतो. कॅनॉलवर सायपन चालतात ती कुणामुळे चालतात. अधिकाऱ्यांना आम्ही सांगतो जरा दुर्लक्ष करा, असे म्हणत कॅनॉलवरील पाण्याबाबत अजित पवारांनी अंदर की बात सांगितली.
लोकसभेला साहेबांना खुश केलं आता मला खुश करा.
दरम्यान, आपल्या भाषणात अजित पवारांनी आर.आर. पाटील यांची आठवणही काढली. मी आर. आर. पाटील यांना झापले होते, तंबाखू सोड म्हणून.. त्याला कॅन्सर झाला. जाताना म्हणला दादा ऐकले असत तर बरं झालं असते, अशी भावनिक आठवण त्यांनी सांगितली.













