मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या मैदानातून अखेर माघार घेतली आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या उमेदवारांची नावं जाहीर करतील अशी अपेक्षा असतानाच त्यांनी माघार घेत असल्याचं जाहीर केलं आणि सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. इतकंच नाही तर आता पाडापाडी करणार असा इशाराही जरांगेंनी दिला आहे. दरम्यान ‘झी 24 तास’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपण ना माघार घेतली आहे, ना यु-टर्न असा दावा केला.






“ना मी माघार घेतली आहे, ना मी यु-टर्न घेतला आहे. मी मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतला आहे. तो अडचणीत येता कामा नये. त्याला वेठीस धरलं जाऊ नये. प्रामाणिक मनाने समाज पाठीशी उभा आहे. त्यांना संकाटत न आणता जास्तीत जास्त फायदा देण्याची जबाबदारी होती. निर्णायक भूमिका घेत ती पार पाडली,” असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. “विधानसभेत शेतकऱ्यांचे, गोर-गरीब मुस्लीम, मराठा, दलितांचे प्रश्ना मांडायला हवे असं वाटत होतं. ती इच्छा लपवून ठेवण्याचं कारण नाही. आपले 5-10 निवडून आले म्हणून लगेच आरक्षण मिळणार अशी बाब नव्हती. तरीही आरक्षणासाठी संघर्ष करावा लागलाच असता. मराठा समाज अडचणीत येऊ नये यासाठी मी हा निर्णय घेतला,” असा दावा मनोज जरांगे यांनी केला.
मराठा समाज नेमका कसा अडचणीत आला असता? असं विचारलं असता ते म्हणाले की, “एका जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही आणि जिंकूही शिकत नाही. मग उगाच उभे करायचे आणि पडले तर समाजाला खाली मानून बघावं लागेल. कोणी टोमणे मारेल. टोचणे देईल, शब्दाचे घाव हे मला सहन होणार नाही. मराठ्यांबद्दल द्वेष असणारे सहा कोटी होते 5 निवडणू नाही आणू शकले असं म्हणतील. त्यामुळे समाजाच्या हिताचा निर्णय घेतला”.
पुढे त्यांनी सांगितलं की, “ही जाणीव मला आधीही झाली होती. यासाठी मेहनत घेत सर्वांना एकत्र करण्याचा निर्णय घेतला होता. पण वेळेअभावी अनके गोष्टी झाल्या नाहीत. समाज भरडेल असं मला वाटलं”. आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उभा राहताही पाडू शकतो. आम्हाला संपवणारे हे कोण हे 7-8 तारखेपर्यंत सांगणार असंही त्यांनी जाहीर केलं.
सत्ताधारी टार्गेट आहेत का? असं विचारलं असता, काही विघ्नसंतोषी लोकांचं ऐकून त्यांनीच खेळ केला असा आरोप त्यांनी केला. गोरगरीबाच्या मुंडक्यावर पाय देण्याचं काम केलं, त्यांना याची फळं चाखावी लागतील. सरकारचं ऐकून माकडासारखी उत्तरं देतात, स्वत:च्या लायकीचा पत्ता नाही. आम्ही त्यांच्या तोंडावर थुकतही नाही, तरी थुका चाटणारे म्हणतात असा संताप त्यांनी व्यक्त केला.











