…अन् अजित पवारांनी कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या Gift वरील ‘तो’ शब्द लपवला; अवघडत म्हणाले, ‘काही…’

0

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुतीबरोबरच महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण यावरुन मागील काही काळापासून बराच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी आणि विरोधक सतत एकमेकांना मुख्यमंत्रिपदाचा तुमचा चेहरा कोण हे जाहीर करा असं आव्हान एकमेकांना करताना दिसले. अर्थात कोणीही अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याची घोषणा केलेली नसली तरी या संभाव्य भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये अनेक नेत्यांची नावं आहेत. यात अगदी सत्ताधारी घटक पक्षांमधील विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचीही चर्चा आहे. यापैकी अजित पवार वगळता दोन्ही नेत्यांनी राज्यातील सर्वोच्च पद भूषवलं आहे. मात्र अजित पवारांनीही अनेकदा राज्यातील सर्वोच्चपदावर विराजमान होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

अजित पवारांना अवघडल्यासारखं झालं

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागील पाच वर्षामध्ये सत्तेत आलेल्या तिन्ही सरकारांमध्ये उपमुख्यमंत्री झाले. राज्यात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांच्याच नावावर आहे. मात्र अजित पवार यांनी स्वत: अनेकदा मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. माझ्या मागून आलेले माझ्या पुढे गेले असं म्हणत मध्यंतरी अजित पवारांनी उघडपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलेली. मात्र सध्या सुरु असलेल्या विधानसभेच्या प्रचारादरम्यान जेव्हा अजित पवारांना त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या स्वप्नातील पदाची पाटी तयार करुन दिली तेव्हा अजित पवारांना अवघडल्यासारखं झाल्याचं दिसून आलं.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

अजित पवारांनी झाकला ‘तो’ शब्द

झालं असं की, अजित पवार आज बारामतीमधून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यापूर्वी शक्तीप्रदर्शन करत रॅली सुरु करण्याआधी त्यांना घराजवळ काही कार्यकर्ते भेटले. या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना एक खास भेटवस्तू दिली. ही भेटवस्तू होती. ‘मा. ना. अजित आशाताई अनंतराव पवार’ असं पहिल्या ओळीत लिहिलेलं होतं. तर दुसऱ्या ओळीमध्ये, ‘मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य’ असे शब्द लिहिलेले. सोनेरी अक्षरांमध्ये मजकूर लिहिलेली ही काळ्या रंगातील काचेची पाटी अजित पवारांनी स्वीकारली. मात्र फोटो काढताना अजित पवारांनी या पाटीवरील ‘मुख्यमंत्री’ हा शब्द गळ्यातील भगव्या शालीने झाकून घेतलं. ‘दादा मुख्यमंत्री दाखवा ना,’ असं एका कार्यकर्त्याने म्हटलं. त्यावर अजित पवारांनी, “काही गरज नाही,” असं उत्तर दिलं.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

अजित पवार म्हणाले, ‘असं लिहून कोणी मुख्यमंत्री होत असतं तर..’

त्यानंतर काही समर्थक अजित पवारांनी नाव झाकलेलं कापड बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते. ‘असं लिहून जर कोणी मुख्यमंत्री झालं असतं तर आबाद ही आबाद झालं असतं,’ असं अजित पवार म्हणाले. त्यावर समर्थकांनी ‘इच्छा तर आहे ना दादा,’ असं म्हणाले. अजित पवारांनी, ‘आपण मॅजिकल फिगर जी म्हणतो 145’ असं म्हणत जो बहुमताचा आकडा गाठतो तो मुख्यमंत्री होतो असं सूचित केलं. अजित पवार यांनी ही पाटी मागे उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकांकडे सोपवताना त्यावर ‘मुख्यमंत्री’ असा उल्लेख असल्याचं व्हिडीओत दिसून आलं.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

सुनेत्रा पवारांनाही दिलेली अशी पाटी

अजित पवारांचा हा संवाद आणि एक शब्द लपवलेलं फोटो सेशल सध्या बारामतीमध्ये चांगलेच चर्चेत आहे. विशेष म्हणजे काहीजणांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून बारामतीमधून लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना त्यांना ‘सुनेत्रा अजित पवार, खासदार, बारामती’ अशी पाटी भेट देिली होती. मात्र सुनेत्रा यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

सोशल मीडियावर व्हायरल

आता अजित पवारांनी मुख्यमंत्री हे नाव नेमकं का झाकलं याचं कारण सांगितलं असलं तरी हा किस्सा सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.