सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची घोडदौड थांबवण्याची विरोधकांना तीन वेळा मिळालेली संधी त्यांनी आळशीपणा आणि चुकीची रणनीती यांमुळे गमावली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप दक्षिण आणि पूर्व भारतातील जागांमध्ये मोठी वाढ करेल, तर उत्तर आणि पश्चिम भारतातील वरचष्मा कायम राखत ३००चा आकडा पार करेल, असे भाकित व्यक्त करत ख्यातनाम राजकीय धोरणकर्ते प्रशांत किशोर यांनी भाजपच्या विजयाच्या दाव्यांवर शिक्कामोर्तब केले आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबतचे आपले आडाखे मांडले. ‘तेलंगणमध्ये भाजप हा पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असेल. ओडिशामध्येही भाजप खात्रीने पहिल्या क्रमांकावर असेल. पश्चिम बंगालमध्येही भाजप पहिल्या क्रमांकावर असेल’, असे भाकित प्रशांत किशोर यांनी केले. तमिळनाडूमध्ये भाजपचा मतटक्का दोन आकडी होईल, असा अंदाजही त्यांनी मांडला.
लोकसभेतील ५४३ जागांपैकी तेलंगण, ओडिशा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार आणि केरळ या दक्षिण आणि पूर्व भारतातील राज्यांमध्ये एकूण २०४ जागा आहेत. भाजपने यापैकी २०१४ मध्ये २९, तर २०१९ मध्ये ४७ जागांवर विजय प्राप्त केला होता. येत्या निवडणुकीत या राज्यांमध्ये भाजपचे बळ मोठ्या प्रमाणात वाढेल, असे भाकीत किशोर यांनी केले. मात्र, भाजप ३७० जागांचे लक्ष्य गाठू शकणार नाही, असे ते म्हणाले.
भाजपचा वरचष्मा असलेल्या उत्तर आणि पश्चिम भारतात त्यांच्याकडून १०० जागा खेचून घेण्यात विरोधी पक्ष यशस्वी ठरले तर भाजपला काहीसा धक्का बसू शकतो, परंतु हे होण्याची चिन्हे नाहीत. या राज्यांत भाजपची ताकद कायम राहील, असे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले.
वल्गना करणारे आदित्य ठाकरे-वरुण सरदेसाई कुठे गेले? तिकीट मिळताच श्रीकांत शिंदेंचा प्रश्न
मागील काही वर्षांत भाजपने दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांकडे लक्ष दिले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी या राज्यांना वारंवार भेटी दिल्या आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यादृष्टीने प्रयत्न केलेले नाहीत, याकडे प्रशांत किशोर यांनी लक्ष वेधले.
‘पंतप्रधानांनी मागील पाच वर्षांत तमिळनाडूला किती वेळा भेट दिली आणि सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा इतर कोणत्याही विरोधी नेत्याने खरी लढत असलेल्या राज्यांना किती वेळा भेट दिली हे पाहा. लोकसभेची खरी लढत उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात आहे. पण ते मणिपूर आणि मेघालयाचा दौरा करत आहेत. मग यश कसे मिळेल?’, असा टोला प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांना मारला.
अमेठीबाबत अनुत्साह काँग्रेसला मारक
सन २०१९ च्या निवडणुकीत स्मृती इराणी यांच्याकडून हार पदरी पडल्यानंतर अमेठीतून लढण्यास राहुल गांधी अनुत्सुक आहेत. त्याबाबत विचारले असता, प्रशांत किशोर यांनी उत्तरेतील हिंदी पट्ट्याचे महत्त्व अधोरेखित केले. ‘उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशात विजय मिळत नसेल, तर केरळमधील विजय काहीही कामाचा नाही. अमेठीवर पाणी सोडले, तर चुकीचा संदेश जाऊ शकतो’, याकडे त्यांनी लक्ष वेधले.