वारजे माळवाडी परिसरामध्ये एकीकडे स्थानिक नगरसेवक वारजे बदलते अशी टेंभी मिरवत सर्वाधिक विकास झाल्याच्या अविर्भावात संपूर्ण खडकवासला मतदारसंघांमध्ये फिरत असताना वारजेचा विकास उघडा नागडा… अशा घोषणा देत गेले तीन महिने मुख्य एनडीए रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यामध्ये कागदी बोटी सोडून पुणे महापालिका प्रशासनाचा स्थानिकांकडून निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. पाऊस पडो अगर न पडो गेले तीन महिन्यांपासून एनडीए रस्त्यावरून पाणी वाहतय ते पण ड्रेनेजचे आणि या ड्रेनेजच्या घाणेरड्या पाण्यातून रोज हजारो नागरीकांना ये जा करावी लागत आहे. या प्रकारचा निषेध माजी नगरसेवक किरण बारटक्के व स्थानिक नागरिकांनी एकत्र येत अनोख्या पद्धतीने आज केला.
वारजे मधील एनडीए रस्त्यावर वाहणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यामध्ये कागदी बोटी सोडुन निषेध आंदोलन करण्यात आले व प्रशासना विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये सामाजिक कार्यकर्त राजीव पाटील, अशोक ऊनकुले, राकेश सावंत, राजेंद्र जैन, माऊली गोरे, प्रसाद कफणे, जीवन सुरवसे, स्वप्निल उपाध्याय आणि सहकारी यांनी सहभाग घेतला. या आगळ्या वेगळ्या निषेध आंदोलनाचे आयोजन माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी केले होते.
किरण बारटक्के यांनी सांगितले, गेल्या तीन महिन्यापासून या रस्त्यावर ड्रेनेजचे घाण पाणी वाहत आहे. याबाबत महापालिका आयुक्त, खाते प्रमुख यांना पत्र देऊन झाली. वॉर्ड ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी पाहणी झाली. निधी मंजूर झाला पण ठोस उपाययोजना नसल्याने मार्ग निघालेला नाही. आता पाऊस आला की पावसाच्या पाण्याबरोबर ड्रेनेजचे पाणी मिक्स होऊन वाहत आहे. यावर तातडीने मार्ग काढणे गरजेचे आहे परंतु महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. या प्रकारामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून पालिका प्रशासनाची भूमिका संताप निर्माण करणारी आहे. यावर तातडीने उपाययोजना नाही झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल.
गेल्या तीन महिन्यापासून वारजे माळवाडी मधील नागरिक या प्रश्नाला सामोरे जात आहेत. रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, आमदार, आजी माजी नगरसेवक या ठिकाणी भेट देऊन गेले मात्र अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. प्रशासनाने लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा अशी आमची विनंती आहे.
-अशोक ऊनकुले