कोथरूड विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने आपल्या दमदार दावेदारी सह उमेदवारी अर्ज दाखल केला अन ज्या प्रमाणात बंडखोरी होईल अशी अपेक्षा असताना सर्वच्या सर्व बंडखोरांनी आपल्या तलवारी म्यान केल्यानंतर ही कोथरूडची उमेदवारी रंजक करण्यासाठी ‘मातोश्री’वर नवी खलबत्ते सुरू झाली आहेत. भारतीय जनता पक्षाचे क्रमांक दोनचे नेते म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांची ओळख असल्यामुळे या भागातील लढतही तोडीस तोड करण्यासाठी शिवसेनेने मनसुबे आखले असून कधीकाळी आपल्या ताब्यात असलेला हा ‘बालेकिल्ला’ पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची(पुणे पॅटर्न)ही मदत घेऊन सर करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मताधिक्य 75 हजाराच्या दरम्यान गेलेले असताना शिवसेनेच्या वतीने या मतदारसंघाबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली होती. तश्या प्रकारे मातोश्रीवर बैठकाही झाल्या परंतु शिवसेना व्यतिरिक्त अन्य मित्र पक्षांची लक्षणीय वाटचाल नसल्याने या मतदारसंघांमध्ये बालेकिल्ला पुन्हा राखण्याचं ‘शिवधनुष्य’ शिवसेनेने पेलण्याचा संकल्प केला आहे. सुरुवातीच्या काळात शिवसेनेचे अंतर्गत दोन्ही इच्छुक आणि बंडखोर केलेला प्रबळ दावेदार अशा तीन पैकी एकाला संधी दिली जाईल असे वाटत होते. पश्चिम महाराष्ट्रातील आद्य नाव शरद पवार यांच्या सूचनेनुसार कोथरूड सर करण्यास शिवसेना उमेदवारी हीच एकमेव योग्य संधी असून त्या दृष्टीने वाटचाल केल्याशिवाय विजयश्री मिळणे अवघड आहे. याची जाणीव झाल्यानंतर प्रभावी तगडी लढत देण्यासाठी सर्व शक्यतांची चाचपणी करण्यात आली असून आज संध्याकाळी कोथरूड चा पक्का निर्णय होणार आहे अशीही माहिती मिळत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत चंद्रकांतदादा पाटील यांचं नाव जाहीर झाल्यानंतर लगेचच विरोधातील उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल अशी शक्यता होती परंतु कोथरूड विधानसभेची लढत तगडी करण्यासाठी संभाव्य शक्यतांची जुळवाजुळव करण्यास कालावधी गेला असला तरीही मराठा आंदोलकांचा रोष लक्षात घेऊन कोथरूडच्या घराघरात गेलेलं नाव जर उमेदवार यादीमध्ये असेल तरच भारतीय जनता पक्षाला प्रभावी टक्कर देत प्रसंगी विजय मिळवणे शक्य असल्याची जाणीव शिवसेना झाल्याने पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्यामुळे आज दुपारी तीन वाजता मातोश्रीवर कोथरूड विधानसभा मतदारसंघाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने कोथरूड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करणे तस अवघड नाही परंतु महाविकास आघाडी मित्र पक्षांची मतेही या अटीतटीच्या निवडणुकीत महत्त्वाची असल्याने मातोश्रीवरून मित्र पक्षांच्या म्हणण्यालाही महत्त्व प्राप्त झाली आहे.
मागील आठवड्यामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांचे वय आणि विरोधक इच्छुक या सर्वांचं विचार करत एक वेगळं नाव दोन दिवस चर्चेत आलं. भारतीय जनता पक्षाला प्रभावी लढत देण्यासाठी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची हक्काची 50 हजार मते शिवसेनेसाठी संजीवनीचे काम करणार असून गेलेला बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी ही एक नामी संधी आहे आणि या संधीचा फायदा उचलण्यासाठीच मातोश्रीवर सध्या बैठकीची खलबत्ते सुरू असून आजची बैठक संपल्यानंतर कोथरूडची गुड न्यूज मात्र नक्की मिळणार अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.