अजय चौधरी की सुधीर साळवी? उद्धव ठाकरेंसमोर धर्मसंकट

0

सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी फार वेगाने घडत आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २८८ मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. त्यामुळे आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. नुकतंच शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत एकूण 65 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे, कोपरी – पाचपाखडी मतदारसंघातून केदार दिघे, ठाणे मतदारसंघात माजी खासदार राजन विचारे यांसह अनेक दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. पण शिवडी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवडी विधानसभेतून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

शिवडी विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी आणि सुधीर साळवी हे दोन शिवसैनिक इच्छुक आहेत. आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शिवडी विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची, याचा तिढा सोडवला जाणार आहे. आज दुपारी साधारण 3 च्या दरम्यान एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पाच शाखाप्रमुखांचा सुधीर साळवींच्या बाजूने कौल
शिवडी विधानसभेतील ५ पैकी ५ शाखाप्रमुखांनी सुधीर साळवींच्या बाजूने भूमिका घेतली आहे. तसेच युवा सेना आणि महिला पदाधिकाऱ्यांनीही सुधीर साळवींच्या बाजूने कौल दिला आहे. पण अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आणि जुने नेते आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीत ते उद्धव ठाकरेंसोबत थांबले. त्यामुळे त्यांचेही मातोश्रीवर महत्त्वाचं स्थान आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघाबद्दल एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकील शिवडीतील सर्व महत्त्वाचे पुरुष आणि महिला पदाधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवडीत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.

सुधीर साळवी की अजय चौधरी? उमेदवारी कोणाला?
शिवडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अजय चौधरी हे ठाकरे गटाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. तर लालबागचा राजा मंडळाचे पदाधिकारी सुधीर साळवी हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून लोकसभा समन्वयक म्हणून सुधीर साळवी यांची नियुक्ती करण्यात आली होती. 2009 ची निवडणूक वगळता शिवडीतून शिवसेनेचे उमेदवार विधानसभेवर निवडून गेले आहेत. 2009 मध्ये मनसेकडून बाळा नादंगावकर यांनी येथे विजय मिळवला होता.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

त्यामुळे आता या मतदारसंघातून अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यातील कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या या मतदारसंघातून मनसेकडून बाळा नांदगांवकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.