महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार पकरिषद घेऊन याबाबत माहिती देण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्रात 26 नोव्हेंबर आधी नवं सरकार बनणार आहे. त्याआधी निवडणूक घ्यावी लागेल, असं राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सांगितलं. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 मतदारसंघ आहेत. महाराष्ट्रात 1 लाख 186 मतदार केंद्र राहतील. या मध्ये 57 हजार 601 ग्रामीण पोलिंग स्टेशन आणि 42 हजार 582 शहरी पोलिंग स्टेशन राहतील, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात ९ कोटी ६३ लाख मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या ही ४ कोटी ९३ लाख इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६६ लाख इतकी आहे. तसेच तरुण मतदारांची १ कोटी ८५ हजार तरुण मतदार आहेत. तर महाराष्ट्रात २० लाख ९३ हजार तरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तसेच दिव्यांग मतदारांची 6 लाख 2 हजार इतकी संख्या आहेत. तर १२ लाख ५ हजार संख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे. विशेष म्हणजे 85 वर्ष वरच्या मतदारांना घरातून मतदान करता येणार आहे. तसेच मोठीं रांग असेल तर रांगेच्या मध्ये खुर्च्यांची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती निवडूण आयुक्तांनी दिली. सर्व पोलिंग स्टेशन 2 किमीच्या आत असावेत, असे निर्देश निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम काय?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच फेजमध्ये होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल, अशी महत्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे.
या निवडणुकीचा निकाल ऐतिहासिक पानांवर ठळकपणे लिहिले जाणार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल आज अखेर वाजलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी जास्त महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांमध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या घडामोडींवर जनतेच्या मनात नक्की आहे ते जाणून घेण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि तिचे निकाल हे इतिहासाच्या पानांवर ठळकपणाने नोंद होणार आहेत. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये जे घडलं ते अनेक दशकांपासून घडलं नव्हतं. महाराष्ट्राला एक चांगली राजकीय संस्कृती आहे असं सुरूवातीपासून मानलं जात आहे. असं असलं तरी या राजकीय संस्कृतीला आता खरंच गालबोट लागलं आहे का, राजकारणात घडलेल्या घडामोडींवर लोकांचा रोष आहे का? ते आता निवडणुकीतून समोर येणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणूक जाहीर कधी होईल? याकडे सर्वांचं लक्ष होतं. जम्मू-काश्मीर आणि हरियात निवडणुका पार पडल्या तेव्हा महाराष्ट्रातही निवडणूक घेतली जाईल, अशी आश होती. पण निवडणूक आयोगावर कामाचा ताण येईल, अपुरे मनुष्यबळ अशा काही कारणास्तव महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, दोन्ही राज्यांच्या निवडणुकांनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तांसह इतर आयुक्त महाराष्ट्रात आले होते. या अधिकाऱ्यांनी निवडणूक तयारीसाठी सर्व्हे केला होता. तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठका देखील घेतल्या होत्या. निवडणूक अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर राज्यात विधानसभेचं बिगूल लवकर लागणार याचे संकेत आधीच मिळाले होते. अखेर निवडणूक जाहीर झाली आहे.
महाराष्ट्रातील सध्याची निवडणूक वेगळी का?
महाराष्ट्रातील सध्याची विधानसभा निवडणूक वेगळी आहे. कारण इथली राजकीय परिस्थिती फार विलक्षण झाली आहे. राज्यातील दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडली आहे. शिवसेना पक्ष हा दोन गटात विभागला गेला आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिवसेना पक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष असे दोन पक्ष निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा तिच अवस्था झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील विरोधातला राष्ट्रवादी पक्ष. सध्याच्या घडीला राज्यात केवळ भाजप आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकसंघ आहेत.
महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणात भाजपचा मुख्य हाथ असल्याने जनता मतदानातून काय प्रतिक्रिया देते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक फायदा झाला होता. काँग्रेस हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर भाजपची मोठी हानी झाली होती. भाजपच्या प्रचंड जागा कमी झाल्या होत्या. त्यामुळे या निकालास लक्षात घेऊन महायुती सरकारने अनेक लोकोपयोगी योजना आणि विकासकामांच्या भूमीपूजनाचा धडाका लावला आहे. लाडकी बहीण ही योजना सरकारची सर्वात महत्त्वकांक्षी योजना आहे. महिलांना एसटी बसचं हाफ तिकीट देण्याचा निर्णय तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी बसचा प्रवास या निर्णयांमुळे सत्तांतर घडवून आणून सत्तेत आलेल्या महायुती सरकारला निवडणुकीत कितपत फायदेशीर ठरतात? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र निवडणुकीत प्रचाराची महत्त्वाचे मुद्दे कोणते राहतील?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारच्या प्रचारात विकासकामे, लाडकी बहीण योनना सारख्या विविध मोठ्या घोषणा ही केंद्रबिंदू राहतील. तर महाविकास आघाडीच्या प्रचारात पक्षफोडीचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो. उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच अॅंजिओप्लास्टी सर्जरी झाली आहे. अशा परिस्थितीत निवडणुका होऊ घातल्या आहेत. ठाकरे गटाच्या इतर नेत्यांनी उद्धव ठाकरे लवकरच प्रचारात सहभागी होतील असा दावा केला आहे. दुसरी शरद पवार यांच्या पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू आहे. या निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष जास्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीमधील अनेक नेते आता पवरांकडे येत आहेत.
महाराष्ट्र विधानसभा: निवडणूक आयोगाने सांगितलेल्या पाच महत्वाच्या गोष्टी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या निवडणुकीची घोषणा केली. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने पाच महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. मतदारांसाठी काही सुविधा दिल्या आहेत.
२४ तास चेकींग होणार
मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे, पैसे वाटप करणे, ड्रग्स वाटप करणे, दारूचे वाटप करणे यावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष असणार आहे. सर्वत्र चेकपोस्टवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. २४ तास चेकींग होणार आहे. एक्साईजचे अधिकारी आणि इतर अधिकारी चेक पोस्टवर राहतील.
गर्दी असल्यास खुर्ची देणार
मतदानासाठी रांगा असल्या तर त्या ठिकाणी खुर्ची ठेवण्यात येणार आहे. यामुळे ज्येष्ठ मतदार किंवा महिलांना त्या ठिकाणी काही वेळ खुर्चीवर बसता येणार आहे. तसेच मतदान केंद्रांमध्ये मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा असणार आहे.
ज्येष्ठ लोकांना घरुन मतदानाची सुविधा
८५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांसाठी घरुन मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. त्या लोकांकडून फार्म १२ भरुन दिला जाणार आहे. हा फॉर्म भरून देणाऱ्याकडे आमची टीम जाणार आहे. तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे. त्यांनाही सोबत घेतले जाईल. सर्व गोष्टींची व्हिडिओ शुटिंग करण्यात येणार आहे. त्याचे रेकॉर्ड ठेवले जाणार आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी….
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना पेपरमध्ये तीनवेळी माहिती द्यावी लागणार आहे. सर्व पोलिंग स्टेशन दोन किलोमीटरच्या आत असावेत, यासाठी निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे.
संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण होणार
निवडणूक आयोगाकडून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. तसेच ज्या जेष्ठ मतदारांचे घरी जाऊन मतदान करुन घेण्यात येणार आहे, त्यांचीही व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे.