शिंदे सरकारकडून मुंबईत टोलमाफीची घोषणा होताच राज ठाकरे म्हणाले “निवडणुकीनंतर…

0

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आता राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून टोलमाफीची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे ही टोल माफी दिली जाणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे. आता राज्य सरकारच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत टोलमाफीचा निर्णय जाहीर होताच राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी मनसैनिकांचे अभिनंदन केले आहे. आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

राज ठाकरे काय म्हणाले?

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा खूप खूप अभिनंदन.

टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला… आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही.

पण असो… किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही. खरंतर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले हे बरे झाले.

महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ‘टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’ असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन, असे राज ठाकरे म्हणाले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार