कोल्हापूरच्या राजकारणाचा पटच अजित पवारांच्या बंडाळीने बदलला!; आमचं ठरलंय इतिहास जमा आत्ता दोस्तीत कुस्ती!

0
7

राज्यात महाविकास आघाडी राजकीय आकार घेण्यापूर्वी तोच प्रयोग कोल्हापूरच्या राजकारणात 2015 मध्ये कोल्हापूरच्या राजकारणातील जय वीरु असलेल्या आमदार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी करून दाखवला होता.त्यामुळे राज्यातील पहिला प्रयोग कोल्हापुरात झाला होता. त्यानंतर हेच समीकरण 2019 मधील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातही आले. मात्र, राज्याच्या राजकारणात सलग दोन राजकीय भूकंपामुळे कोल्हापूरच्या राजकारणाचीच खिचडी होऊन गेली आहे. त्यामुळे भक्कम वाटणारा काँग्रेस एकाकी पडल्याचे चित्र आहे. कोल्हापूर मनपासह जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूका प्रलंबित असल्याने या बदलांचा परिणाम आता पावसाळ्यानंतर दिसून येणार आहे.

शिंदेंच्या बंडाळीने शिवसेना खिळखिळी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर ठाणे, छत्रपती संभाजीनगरनंतर सर्वाधिक पडसाद कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाचे दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी शिंदे गटाच्या गळाला लागले. यानंतर जिल्ह्यातील एकमेव सेना आमदार प्रकाश आबिटकर यांनीही गुवाहाटी गाठली. माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि चंद्रदीप नरके सुद्धा शिंदे गटात गेल्याने कोल्हापुरात ठाकरे गटात फक्त पदाधिकारी राहिले आहेत. यामुळे ठाकरे गटाची ताकद क्षीण होऊन गेली आहे. हे कमी म्हणून की काय जिल्हाप्रमुख विजय देवणेंविरोधात कुरबुरी मातोश्रीवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडी कायम राहिल्यास ठाकरे गटाला काँग्रेस आणि पर्यायाने सतेज पाटील यांच्या सोबतीने डावपेच आखावे लागतील, अशी स्थिती आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

मुश्रीफांनी दिला राजकीय धक्का

शिंदेंनंतर अजित पवार यांच्या बंडाळीने कोल्हापुरात आणखी राजकीय खिचडी झाली आहे. हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांना साथ दिल्याने कोल्हापूरमध्ये राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलून गेली आहे. त्यामुळे आजघडीला जिल्हा काँग्रेसविरोधात अनेक गट तट एकत्र आले आहेत. यामध्ये भाजप, अजित पवार गट, मंडलिक, महाडिक, शिंदे गट काँग्रेसविरोधात असतील असे चित्र आहे.

मुश्रीफ मंत्री होऊन कोल्हापुरात परतल्यानंतर जिल्हा बँकेच्या बॅनर्सवरून काँग्रेस गायब होणे ही त्याचीच साक्ष होती. त्यामुळे गेल्या 13 वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात एकत्र असलेल्या हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची आगामी कोल्हापूर मनपा, लोकसभा आणि विधानसभेला विरुद्ध दिशेला तोंड असतील, यात शंका नाही. आघाडी धर्म मोडून संजय मंडलिकांना 2019 निवडून आणणाऱ्या सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय हे इतिहासजमा झाल्याचे म्हटले आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

राजकीय बंडाळीने सतेज पाटलांचे विरोधक एकवटले, मुश्रीफांची सुद्धा भर पडली

सतेज पाटील यांनी मुश्रीफांच्या साथीने गोकुळ, जिल्हा बँक, बाजार समितीवर झेंडा फडकावला होता. महापालिकेतही महाविकास आघाडी पॅटर्न राबवला. मात्र, या सर्व प्रक्रियेत सतेज पाटलांनी काँग्रेस पक्षालाही स्थान मिळवून देतानाच स्वत:चे स्थानही बळकट केले. मात्र, मुश्रीफ पक्ष वाढवण्यात पिछाडीवर राहिले. आता झालेल्या बंडाळीने अजित पवार गट, महाडिक गट, मंडलिक, माने गट, शिंदे गट, आवाडे गट, कोरे गट हे सर्व काँग्रेस विरोधात असतील. यामुळे राजाराम कारखाना निवडणुकीत मुश्रीफांचा अपवाद वगळता सतेज पाटील यांना विरोधकांनी घेरले होते, तशीच काहीशी स्थिती आता भविष्यात असेल. या राजकीय पडसादानंतर गोकुळमध्येही पडसाद उमटणार का? अशीही चर्चा आहे. मात्र, गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे मुश्रीफांच्या व्यासपीठावर दिसून आल्याने लगेच काही हालचाली होतील असे दिसत नाही. असे असलं तरी राजकारणतील स्तर पाहता भविष्याचा कोणताही अंदाज वर्तवता येणार नाही.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

दोन्ही खासदारांचे भवितव्य अंधातरीच

कोल्हापूरमध्ये भाजपच्या तयारीने दोन्ही विद्यमान खासदारांना आगामी लोकसभेत कोणाकडून तिकिट मिळणार हे त्यांनाच माहित नसावे, अशी स्थिती आहे. लोकसभेसाठी काँग्रेस, शिंदे गटाकडून कोल्हापूरच्या जागेवरून दावे सुरु असतानाच आता अजित पवार गटाची भर पडली आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून कागलमधील राजकीय कुरघोडी टाळण्यासाठी मुश्रीफांना लोकसभेसाठी तिकिट दिलं जाणार का? अशी चर्चा रंगली आहे. कागलमधून आमदार होणारच असा निर्धार समरजित घाटगे यांनी केला आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केल्याने धैर्यशील माने काय करणार? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून धैर्यशील माने यांना घाम सुटला असेल यात शंका नाही. जिल्ह्यात काँग्रेस विरोधकांची संख्या वाढत चालली, असली तरी लोकसभेला उमेदवार कोण असणार? हेच राहणार की बदलले जाणार? महाविकास आघाडी म्हणून लढल्यास उमेदवार कोण? काँग्रेसला जागा मिळाल्यास त्यांचा उमेदवार कोण? ठाकरे गटाला मिळाल्यास कोणाच्या पारड्यात वजन पडणार? असे बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत.