पुणे : महाराष्ट्रातील सर्वात गतीमान आणि लोकप्रिय ठरलेला महामार्ग म्हणजे पुणे-मुंबई एक्सप्रेस वे. मुंबई आणि पुणे या शहरांना जोडणारा हा महामार्ग केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री असताना हाती घेण्यात आला होता. त्यानंतर, एप्रिल 2002 मध्ये या मार्गाचे लोकार्पण करण्यात येऊन ते प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे. 94.5 किमी लांबीचा राज्यातील सर्वात गतीमान आणि मुंबई-पुणे शहरांच्या विकासाला नवी दिशा देणारा हा महामार्ग राजमार्ग ठरला आहे. सध्या वाहतूक कोंडीमुळे किंवा अपघातांच्या घटनांमुळे हा महामार्ग कायम चर्चेत असतो. दरम्यान, आज पुण्यातील रस्तेमार्ग विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना नितीन गडकरींनी पुणे-मुंबई महामार्गावर भाष्य केलं. तसेच, हा महामार्ग करताना माझी चूक झाली,असेही ते म्हणाले.






पुणे-मुंबई महामार्ग करताना माझी चूक झाली. मला तो कात्रजपासून करायचा होता. पण काही अधिकारी म्हणाले की खर्च वाढेल. अधिकारी ठराविक वय झालं की रिटायर्ड होतात. नवीन कपडा शिवन्याएवजी त्याला रफ्फू करणे ही त्यांची जिवनदृष्टी असते. त्यामुळे, वाहतूक समस्या निर्माण झाल्याचं सांगताना तो महामार्ग कात्रज ते मुंबई असा करायची कल्पना आपल्या डोक्यात होती, असेही गडकरी यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना म्हटले. पुण्यात 899 कोटी रुपयांच्या विविध रस्तेमार्ग विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी गडकरी बोलत होते. तसेच, राज्य सरकारची जबाबदारी असलेले पुणे – मुंबई आणि अहमदनगरच्या पुढे दोन टोल नाके आहेत, तो रस्ता अशा दोन रस्त्यांवरील खड्डे तीन महिन्यांत बुजवले न गेल्यास हे दोन्ही रस्ते राज्य सरकारकडून काढून घेण्याचा इशाराही गडकरींनी दिलाय.
8 हजार कोटींना विकला रस्ता
आम्ही पुणे-मुंबई एक्सप्रेस वे बांधला, त्यानंतर कॉग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आलं. त्यानंतर एम एस आर डी सी चे मॅनेजिंग डायरेक्टर करंदीकर माझ्याकडे आले आणि म्हणाले की हा लॉस मेकींग रस्ता आहे. यावर मार्ग कसा काढायचा. मी म्हटलं आता राज्य त्यांच आहे. त्यांना मार्ग काढू दे. मग पवार साहेबांचा फोन आला की एक्सप्रेस वे तुझं अपत्य आहे. समस्या तूच सोडविली पाहिजे. मग मी जुना पुणे मुंबई हायवे एमएसआरडी सीकडे हँडओव्हर केला. पण अट अशी घातली की, या रस्त्यावरचे पूल बांधून रस्ता चांगला ठेवले पाहिजे. पण त्यांनी तो रस्ता आठ हजार कोटींना विकून टाकला आणि ते कामच करत नाहीत, असेही गडकरी यांनी पुणे-मुंबई महामार्गाबाबत म्हटले.
अधिकाऱ्यांना नोटीसा काढा – गडकरी
मी आत्ताच माझ्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, महाराष्ट्र सरकारला नोटीस द्या की तीन महिन्याच्या आत या रस्त्यावरचे आणि अहमदनगरच्या पुढे कल्याण रस्त्यावर महाराष्ट्र सरकारचे दोन टोल आहेत तिथे रस्ता खराब आहे. रस्ता आमचा, काम महाराष्ट्र सरकारचे आणि शंभर टक्के शिव्या मी खातो. त्यामुळे मी आजच अधिकाऱ्यांना सांगितले आहे की नोटीस काढा. तीन महिन्याच्या आत रस्ते दुरुस्त नाही झाले तर करार रद्द करा आणि रस्ते आपल्या ताब्यात घ्या, असेही गडकरी यांनी म्हटलं. दरम्यान, येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात तब्बल दीड लाख कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन होईल आणि कामं सुरुदेखील होतील, असेही गडकरी यांनी म्हटले.
जातीपातीच्या राजकारणावरही भाष्य
सध्या महाराष्ट्रात बरच जातीपातीचे राजकारण सुरू आहे, मी कधीही जात-पात पाळत नाही. मी 50 हजार लोकांसमोर सांगितलं, मी जात-पात पाळणार नाही,मी जातीपातीचे राजकारण करणार नाही. जो करेगा जात की बात उसको मारुंगा कसके लाथ, जिसको देना वोट दो, जिसको नही देना मत दो. मला मत द्या देऊ नका मी सगळ्यांची काम करणार आहे. मी मतदान देणार त्यांचं पण काम करणार जे नाही देणार त्यांचा पण काम करणार , असेही गडकरी म्हणाले.











